शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

सांगली फर्स्टमधून सांगलीच्या औद्योगिक विकासाला चालना - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

- सांगली फर्स्टचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
- तीन दिवस चालणार प्रदर्शन

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : राज्य शासनाने गावोगावी उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता कौशल्य विकास अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून 30 हजार 800 विद्यार्थ्यांना विविध 28 प्रकारचे 28 प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतले आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्र मेक इन महाराष्ट्रच्या माध्यमातून राज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणली आहे. सांगली फर्स्ट उपक्रमाच्या माध्यमातून सांगलीत चांगले उद्योग येतील, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी मदत होईल आणि सांगलीच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित सांगली फर्स्ट या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमन पाटील, गोपाळराजे पटवर्धन, दीपक म्हैसाळकर शिंदे, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, सांगली - मिरज - कुपवाडचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, श्रीनिवास पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
सांगली फर्स्ट प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठेतील अद्ययावत तंत्रज्ञान छोट्या उद्योजकांना मिळेल. बँकेचे कर्ज, व्हेंचर कॅपिटल, भागिदारी अशा माध्यमातून छोट्या उद्योजकांना मोठी स्वप्ने पाहण्याची संधी मिळेल, अशी आशा व्यक्त करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून जगातील उद्योग जगतातील अद्ययावत  तंत्रज्ञान राज्यातील सुजाण उद्योजकांना पाहण्याची संधी मिळाली. लातूरमध्ये मेट्रोसाठी आवश्यक डबे निर्मितीचे युनिट, यंत्रमाग उद्योगाला चालना, विमानाचे पार्ट बनवण्यासाठी साताऱ्यातील तरूणाच्या स्वप्नांना मिळालेले बळ, ग्रामीण भागात शेतकरी कंपन्यांना कर्ज सुविधा अशा अनेक गोष्टींमधून राज्य शासन उद्योजकांना आकर्षित करून प्रोत्साहन देत आहे, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले, सांगली जिल्ह्याला अनेक क्षेत्रात मोठा वारसा लाभला आहे. या जिल्ह्याने अनेक रत्ने राज्य देशाला दिली आहेत. त्यामुळे रेल्वे, महामार्ग, पोर्ट आणि इंटरनेट अशा दळणवळणाच्या विविध माध्यमातून सांगली जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. राज्यातील कोणत्याही महानगराच्या तोडीस तोड सांगली होईल. विकासाच्या नवनव्या कल्पना मांडा, त्या सत्यात आणण्यासाठी विकासाच्या यात्रेत केंद्र राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे ते म्हणाले.
केंद्रीय दूरसंचार रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले, पुणे मिरज दुहेरीकरणासाठी 2 हजार 436 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे काम गतीने सुरू आहे. तसेच पुणे - मिरज - कोल्हापूर विद्युतीकरणाचे कामही गतीने होईल. सांगली जिल्ह्यात अतिवेगाने इंटरनेट सुविधा, सांगलीत पासपोर्ट सुविधा केंद्र, पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधा अशा अनेक बाबी केंद्र शासनाने हाती घेतल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, मार्चमध्ये नवीन दूरसंचार धोरण, रेल्वे प्रवाशांची सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय दूरसंचार रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले, केंद्र शासनाने भारतीय रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 5 लाख नागरिकांपर्यंत आरोग्य कवच पोहोचवले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे 18 हजार गावांपैकी 15 हजार 367 गावांमध्ये वीज पोहोचली आहे. उर्वरित गावात आगामी कालावधीत वीज पोहोचवू. सौभाग्य योजनेच्या माध्यमातून 4 कोटी  परिवारांना मोफत वीज देण्यात येत आहे, असे सांगून त्यांनी सांगली फर्स्ट प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील तरूणांच्या डोळ्यातील स्वप्ने साकार होतील. उद्योगजगताला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पक्षभेद विसरून जिल्ह्याला पुढे नेण्याचा प्रयत्न सांगली फर्स्टच्या माध्यमातून करत असल्याचे सांगून खासदार संजय पाटील यांनी सांगली जिल्ह्याचा वारसा, शेतकऱ्याला न्याय आणि औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी होत असलेले प्रयत्न सांगून सांगली जिल्ह्यात रेल्वेकोच बनवण्याचा कारखाना सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
गोपाळराजे पटवर्धन, दीपक शिंदे म्हैसाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सांगली फर्स्टचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात यंत्रमाग उद्योगातील तंत्रज्ञान, कृषिपूरक अन्न प्रक्रिया उद्योगातील तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि आरोग्य क्षेत्रामधील विविध स्टॉल्स सहभागी झाले आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी विविध शासकीय अधिकारी, मान्यवर, नागरिक, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा