सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या वस्तुंना दख्खन जत्रेच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ - पालकमंत्री सुभाष देशमुख

राजमाता जिजाऊ स्वावलंबन तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण

सांगली, दि. 12 (जि. मा. का.) : ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना दख्खन जत्रेच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्या महिला बचतगटांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळालेल्या बचतगटांनी अधिकाधिक चांगले काम करावे प्रगती करावी, असे प्रतिपादन सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.
इस्लामपूर येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घेण्यात येणाऱ्या राजमाता जिजाऊ स्वावलंबन तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने, प्रिया देशमुख, अग्रणी बँक व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, बचत गटांनी यापुढे अधिक चांगले काम करावे हा पुरस्कार देण्याचा हेतू आहे. गावामध्ये तयार केलेल्या वस्तूंची विक्री करता आली पाहिजे, चांगला दर मिळावा यासाठी महिला बचत गटांनी मार्केटिंगचे तंत्र अवगत करावे. तसेच आपले काम जिल्ह्यात राज्यात आदर्श ठरावे यासाठी प्रयत्न करावेत.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत तयार करण्यात आलेल्या घडिपत्रिकेचे तसेच सांगली जिल्हा परिषद निवृत्ती वेतन धारकांकरिता हेल्पलाईन, टोल फ्री दूरध्वनी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तालुकास्तरावरील 10 तालुक्यातील प्रथम तीन महिला बचत गटांना पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते बक्षीस, स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. तालुकानिहाय प्रथम क्रमांकास 5 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 3 हजार तृतीय क्रमांकास 2 हजार रूपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख अन्य मान्यवरांनी दख्खन जत्रा कृषि महोत्सवाअंतर्गत विविध स्टॉलना भेट देवून पाहणी केली समाधान व्यक्त केले. 
प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांनी केले. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रिया देशमुख यांनी मानले.

     या कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील विविध बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा