शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

44-सांगली लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक अधिसूचना प्रसिध्द 7 मे रोजी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 सांगली दि. 12 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिध्द करण्यात आली असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल दुपारी 3 पर्यंत आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख 22 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. या निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होत असून सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून लोकशाही बळकटीकरणासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, दरदिवशी नामनिर्देशन पत्र भरल्याची माहिती दर्शनी भागात नमुना क्रमांक 4 मध्ये नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी 100 मीटर परिसरात फक्त 3 वाहनांना परवानगी तसेच उमेदवारासह अन्य 4 जणांना परवानगी असेल. दिनांक 13, 14 व 17 एप्रिल रोजी शासकीय सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशन पत्राची छाननी 20 एप्रिल रोजी आहे. छाननी करीता उमदेवार ऑनलाईनही अर्ज दाखल करू शकतात. उमदेवारांच्या खर्चाची तपासणी 3 वेळा करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 2448 मतदान केंद्रे (सहाय्यकारी मतदान केंद्रासह (Aux Polling Station) आहेत. शिराळा तालुक्यात 03 शॅडो मतदान केंद्रे असून या ठिकाणी संपर्कासाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात 12 एप्रिल अखेर एकूण 24 लाख 34 हजार 117 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 42 हजार 152, स्त्री मतदार 11 लाख 91 हजार 854, तृतीयपंथी 120 मतदार आहेत. यामध्ये दिव्यांग मतदार 20 हजार 945, तर 85 वर्षावरील 39 हजार 240 इतके मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वर्षे वयोगटातील 40 हजार 285 मतदार आहेत. उमेदवाराच्या इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया वरून राजकीय जाहिराती प्रसिध्द करण्यासाठी जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या एमसीएमसी समितीकडून पूर्व प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रिंट मीडियामधून उमेदवाराच्या राजकीय जाहिराती प्रसिध्द करण्यासाठी एमसीएमसी समितीकडून पूर्व प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. 85 वर्षावरील नागरिकांना व दिव्यांगांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुक्त, निर्भय, पारदर्शक व शांततामय वातावरणात निवडणूक होण्यासाठी विविध विषयासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीबाबत मतदारांना 1950 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. सीव्हिजील ॲपवर तक्रार प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटाच्या आत तक्रारीचे निराकरण करता येणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या अनुषंगाने व आदर्श आचारसंहिता भंगाबाबत प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी FST - 68, SST - 78, VST - 40 तर VVT - 17 पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. आचारसंहितेचे पालन करण्याकरीता जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष (24 x 7) स्थापन करण्यात आलेला आहे. सदर कक्षाकरीता 0233-2600185 हा दुरध्वनी क्रमांक आहे. नागरिकांना मतदान कार्ड, मतदारयादी, ऑनलाईन रजिस्ट्रेशन इ. बाबतच्या माहितीकरीता Voter helpline 1950 हा दुरध्वनी नंबर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. आज अखेर एकूण 2474 शस्त्रापैकी 2084 इतकी शस्त्रे अनामत करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्रावर मतदारांना सावलीची व पाण्याची सोय केली जाणार आहे. दिव्यांगासाठी रॅम्प सोय करण्यात येणार असून त्यांना विना रांग मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रावर अत्यावश्य वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी सांगितले. निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज - पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, आंतरराज्य व आंतरजिल्हा चेक पोस्टवर आवश्यक चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यावेळी त्यांनी अवैध दारू, गांजा जप्तीबाबत माहिती दिली. पोलीस पथकाव्दारे नियमित तपासणी सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील काळात निवडणुका निर्भय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. 0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा