शनिवार, १३ एप्रिल, २०२४

छपाईच्या अनुषंगाने मुद्रक - प्रकाशक यांना जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : लोकसभा निवडणुकेच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निवडणूक पत्रके, भित्तीपत्रके छपाई करण्याबाबत सांगली लोकसभा मतदार संघातील सर्व मुद्रक व प्रकाशक, राजकीय पक्ष, उमेदवार यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127 (A ) मधील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाची छपाई करायाची आहे, त्या व्यक्तीने म्हणजेच प्रकाशकाने विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र , मुद्रकाला देणे आवश्यक आहे. या प्रतिज्ञापत्रावर प्रकाशकाची स्वतःची स्वाक्षरी असावी, तसेच त्याला ओळखणा-या दोन व्यक्तींनी सदर प्रतिज्ञापत्र साक्षांकीत केले पाहीजे. त्याचबरोबर जात, धर्म, भाषा इ. कारणांनी दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण होईल, कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर टीका होईल असा आक्षेपार्ह मजकूर छापण्यात येऊ नये. तसेच पत्रकावरील मजकुरामुळे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता संबंधित मुद्रकांनी घ्यावी. छपाई केलेल्या निवडणूक पत्रकावर दर्शनी भागात मुद्रक व प्रकाशक यांचे नाव पत्ता व छपाई केलेल्या प्रतींची संख्या आदी बाबी छपाई प्रणालीमध्ये स्पष्टपणे दिसून येतील अशा पध्दतीने नमूद कराव्यात. मुद्रकांनी छपाई केलेल्या पत्रकाच्या बरोबर प्रकाशकाचे प्रतिज्ञापत्र तसेच विहीत नमुन्यातील परिशिष्ट बी मधील माहिती छपाई कैलेपासून 3 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना देणे मुद्रकावर बंधनकारक आहे. उपरोक्त तरतुदींचे, निर्देशांचे उल्लंघन करू नये. उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईही होवू शकते. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी 18 मार्च रोजी मुद्रकांची बैठक घेवून सविस्तर सूचना दिल्या आहेत तसेच राजकीय पक्षांच्या घेतलेल्या बैठकांमध्येही या तरतुदींबाबत वारंवार सुचित केले आहे. उमेदवाराच्या अनाधिकृत खर्चावर निर्बंध घालण्याच्या अनुषंगाने तसेच उमेदवाराच्या / पक्षाच्या जाहिरातीमधून आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित न होण्याच्या दृष्टीने सदर बाब अत्यंत महत्वाची आहे.तरी, जिल्हयातील सर्व मुद्रक, प्रकाशक, उमेदवार, पक्षप्रमुख यांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 127 (A) च्या पालना बाबत जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा