मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

घरोघरी भेट देवून मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : जिल्ह्यात लोकसभेसाठी दि. 7 मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असे आवाहन करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, स्वीपचे नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरोघरी भेट देवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हाधिकारी कार्यालयात तालुकास्तरीय स्पीप नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, गेल्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर कमी मतदान झाले आहे, अशा ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. याबरोबरच या भागात घरोघरी भेट देवून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करावे. मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात प्रसिध्दीसाठी वापरण्यात येत असलेले पोस्टर, बॅनर, भित्तीपत्रके आदी साहित्य याची जिल्हास्तरावरून अनुमती घ्यावी. जत तालुक्यातील कर्नाटक सिमा भागात कन्नड भाषेतही स्वीप उपक्रम राबवावेत. स्वीप अंतर्गत सकाळी 11 पूर्वी व दुपारी 4 नंतर उपक्रम राबवावेत. महापालिकेने त्यांच्या आस्थापनांच्या ठिकाणी तसेच कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रावर मतदान जागृतीसाठी बॅनर लावावेत. सध्या कृषी विभागामार्फत संपर्क मोहिम राबविण्यात येत असून या मोहिमेत मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी यावेळी सांगितले. स्वीप उपक्रमांतर्गत मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमातून जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला. यावेळी तालुकास्तरीय स्वीप नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या स्वीप उपक्रमांची माहिती दिली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा