सोमवार, २२ एप्रिल, २०२४

निवडणूक आयोगाने खर्चाच्या लेखांच्या संदर्भात केलेल्या सूचनांचे पक्ष व उमेदवारांनी काटेकोर पालन करावे निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार यांच्या सूचना

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ सांगली, दि. 22 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने ९५ लाखाची खर्च मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी खर्चाची मर्यादा पाळून खर्चाची नोंद नियमित करावी. या बरोबरच निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चाच्या लेखांच्या संदर्भात दिलेल्या सूचनांचे सर्व राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी काटेकोर पालन करावे, अशा सूचना ४४-सांगली लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी दिल्या. ४४-सांगली लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक कालावधीत करण्यात येणाऱ्या खर्चासंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीस उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक तथा जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी शिरीष धनवे यांच्यासह निवडणूक लढविणारे उमेदवार, प्रतिनिधी उपस्थित होते. खर्च निरीक्षक श्री. संजीव कुमार म्हणाले, उमेदवारांनी त्यांच्या प्रचारासाठी handbill, pamphlet, manifesto यांची छपाई करताना त्यावर मुद्रक आणि प्रकाशक यांची नावे नमूद करणे आवश्यक आहे. उमेदवाराने प्रत्येक दिवसाचा खर्च विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराने त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती नामनिर्देशन करताना नमूद केली असल्यास त्याबाबत प्रचार कालावधीत तीन वेळा प्रिंट मीडिया, आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिद्धी द्यावी आणि त्याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समावेश करावा. निवडणूक अनुषंगाने खर्च करण्यासाठी बँकेत उघडण्यात आलेल्या बँक खात्यामार्फत सर्व व्यवहार करावेत. निवडणूक खर्चाची माहिती नियमित खर्च विषयक समितीकडे सादर करावी. यावेळी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ खर्च संनियंत्रण प्रक्रिया, निवडणूक खर्चाशी संबंधित विधीविषयक तरतुदी आणि या तरतुदींचे अनुपान न केल्यास होणारे परिणाम या बाबतही माहिती देण्यात आली. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा