शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून महेश ढोलेंचा व्यवसायविस्तार

जनसामान्यांसाठी केंद्र राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. ज्यांनी या योजनांचा लाभ घेतला, त्यांना स्वतःची उन्नती साधता आली, साधारण दहा वर्षांपूर्वी प्रधानमंत्री रोजगार योजना आणि गेल्या वर्षी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळालेल्या महेश ढोले यांना ही किमया साधता आली.
महेश ढोले यांनी नोकरीच्या मागे लागता मेडिकलमध्ये काम करून मेडिकल व्यवसायाचा अनुभव घेतला. चार ते पाच वर्षे अनुभव घेतल्यानंतर त्यांना स्वतःचे मेडिकल दुकान करण्याचे स्वप्न खुणावू लागले. 2008 साली महेश ढोले यांना प्रधानमंत्री रोजगार योजनेतून एक लाख रुपये कर्ज मिळाले आणि त्यांचे हे स्वप्न सत्यात आले. त्यांनी डॉ. वसावडे हॉस्पिटलमध्ये शिवतीर्थ हे मेडिकल दुकान सुरू केले. दहा वर्षे हे मेडिकल नियोजनबद्ध चालवल्यानंतर त्यांना व्यवसायविस्ताराची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती.
याबाबत महेश ढोले म्हणाले, व्यवसायविस्तारासाठी बँक ऑफ इंडियामध्ये मी कर्जाची चौकशी केली. त्यावेळी बँकेच्या गावभाग शाखेमध्ये मला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती मिळाली. ही संधी साधायची, असे ठरवून मी मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज केला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मला गेल्या वर्षी 11 लाख 50 हजार रुपये कर्ज मिळाले. एवढी मोठी रक्कम वैयक्तिकरीत्या उभा करणे मला शक्य नव्हते. त्यामुळे मिळालेल्या कर्जाची किंमत मला होती. त्यातून मी किरकोळ औषधविक्रीसाठी शासकीय रूग्णालयाजवळ आधार मेडिकल हे दुकान सुरू केले. तसेच, भागीदारीत घाऊक औषधविक्रीचा व्यवसाय सुरू केला. यात माझा चांगलाच जम बसला आहे, असे त्यांनी आनंदाने सांगितले.
महेश ढोले यांच्या मेडिकलमध्ये सर्व प्रकारची ॲलोपॅथी औषधांची विक्री केली जाते. कर्जातून मिळालेल्या रकमेतून त्यांना औषधसाठा वाढवण्यासही मदत झाली आहे. मुद्रा योजनेतून कर्ज मिळण्यापूर्वी महेश ढोले यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 ते 30 लाखापर्यंत होती. ती आता जवळपास 50 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. एका वर्षात ही उलाढाल दुप्पट करून कर्जरूपी संधीचे त्यांनी सोने केले आहे.

                     - वर्षा पाटोळे
                       जिल्हा माहिती अधिकारी
                       सांगली
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा