शनिवार, २६ जानेवारी, २०१९

सांगली जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना 455 कोटी रुपये रकमेचा लाभ - पालकमंत्री सुभाष देशमुख

प्रजासत्ताक दिनाचा 69 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : राज्यातील शेती आणि शेतकरी या दोहोंच्या उन्नतीसाठी शासन प्रयत्नशील असून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सांगली जिल्ह्यात एकूण 1 लाख 53 हजार 345 शेतकऱ्यांना 455 कोटी 27 लाख रुपये रकमेचा लाभ दिला आहे, असे सांगून शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिला.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगीता खोत, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा आदि मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सांगली जिल्ह्यात 39 हजार 557 थकबाकीदार शेतकऱ्यांना 173 कोटी 60 लाख रूपयांची कर्जमाफी केली आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या 98 हजार 451 शेतकऱ्यांना 160 कोटी 41 लाख रूपयांची प्रोत्साहनात्मक रक्कम देण्यात आली आहे. तसेच, ज्यांचे कर्ज दीड लाख रूपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा 15 हजार 337 शेतकऱ्यांना एकवेळ समझोताव्दारे 121 कोटी 26 लाख रूपये देण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण 1 लाख 53 हजार 345 शेतकऱ्यांना 455 कोटी 27 लाख रुपये रकमेचा लाभ जिल्ह्याला दिला आहे. तसेच, विहित मुदतीत पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांसाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून चालू आर्थिक वर्षात साडेदहा कोटी रुपयांची तरतूद केली असून, यातील जवळपास दीड कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सांगली जिल्ह्यातील 9 तालुक्यांतील 37 महसुली मंडळांतील 476 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ घोषित केलेल्या गावांमध्ये 8 विविध प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. तसेच पशुधन वाचवण्यासाठी चारा टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. दुष्काळी परिस्थितीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने, कार्यक्षमतेने आणि संवेदनशीलपणे काम करावे, असे त्यांनी यावेळी सर्व यंत्रणांना सूचित केले.
    पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, उद्योजकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याचे केंद्र राज्य शासनाचे धोरण आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना सरळ सुलभ कर्ज देण्यासाठी पीएसबी लोन्स इन 59 मिनिटस् या योजनेत सांगलीची पथदर्शी जिल्हा म्हणून निवड झालेली आहे. या योजनेतून जिल्ह्यात आतापर्यंत 143 लाभार्थ्यांना जवळपास 14 कोटी रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. छोटे उद्योजक महिला उद्योजकांसाठी ही एक चांगली संधी असून जास्तीत जास्त लघु उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यात गोवर आणि रूबेला लसीकरण मोहिमेतून पावणेसात लाख जणांना लस देऊन ही मोहीम यशस्वीपणे राबवल्याबद्दल सर्व यंत्रणांचे कौतुक केले.
    पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, 26 जानेवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून, आगामी सर्व निवडणुकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घ्यावा. तसेच, स्वत:बरोबर इतर सहकाऱ्यांनाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहीत करावे. येत्या 31 जानेवारी रोजी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होत आहे. त्यामध्ये आपले नाव असल्याची खात्री प्रत्येक सुजाण नागरिकाने करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
    आगामी लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रणा वापरण्यात येणार आहे. मतदाराला त्याने केलेल्या मतदानाची पडताळणी दाखविणारी, मतदानाबद्दल विश्वासार्हता निर्माण करणारी ही एक यंत्रणा आहे. या बाबतची जनजागृती मोहीम जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. तसेच, निवडणूक संदर्भातील कोणत्याही माहितीसाठी, चौकशीसाठी किंवा समस्येचे निराकरण करण्यासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. याचा मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून या उपक्रमांसाठी मेहनत घेतलेल्या सर्व यंत्रणांचे निवडणूक विभागाचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी अभिनंदन केले.
    जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचे, तसेच यशवंत पंचायत राजमध्ये सांगली जिल्हा परिषदेने मिळवलेल्या यशाबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत आणि पोलीस विभागाने राबवलेल्या उपक्रमांबद्दल पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच महापालिकेने राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल महापालिका यंत्रणेचे पालकमंत्री देशमुख यांनी कौतुक केले.
    पालकमंत्री देशमुख म्हणाले, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता कौशल्य विकास अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज व्याज परताव्याच्या 3 योजना आहेत. या योजनेतून सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 200 लाभार्थ्यांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे. एकूणच सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि सांगली जिल्हा कृषि, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रारंभी प्रजासत्ताक दिनानिमित्त सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते 10 प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप आदेश वितरीत करण्यात आले. तसेच नवोदित मतदारांना शुभेच्छापत्र देण्यात आले. गेली दोन दशके माई घाट कृष्णा नदी स्वच्छतेसाठी स्वच्छतादूत सतिश दुधाळ यांचा सत्कार करण्यात आला. भारत सरकारतर्फे राष्ट्रीय पुरस्काराने नेहरू पुरस्काराने सन्मानीत ऍ़ड. तुशाल शिवशरण यांचाही सत्कार करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी विभागात माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह मयुरेश अभ्यंकर आणि वर्षा लिमये यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सन 2018 मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
 दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांतर्गत सचिन पाटील यांना वैश्विक ओळखपत्राचे तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी काम केल्याबद्दल अजिंक्य फौंडेशन कुपवाड या संस्थेला दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार देण्यात आला. जिल्हा उद्योग पुरस्कारांतर्गत लकडे पॉलिफॅब्स इंडस्ट्रीज विटाचे संचालक विशाल लकडे तसेच प्रसादिती मेडीकल इक्वीपमेंटस, मिरजचा सन्मान करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अलकूड (एम) आणि सावळवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लहान वयात शौर्य दाखवून वडिल बहिणीचे प्राण वाचविल्याबद्दल चार वर्षाच्या संकेत भुरट यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकारी उषा नरळे, शमशुद्दीन शेख, वैभव होनमोरे, दत्तात्रय कुंभार, राजकन्या मुके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल विजय कडणे आणि पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यानांही गौरविण्यात आले.
आजच्या संचलनामध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, वनरक्षक दल, महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाची जागृती करणारा पत्रकार दीपक चव्हाण यांचा शोले स्टाईल चित्ररथ, नॅशनल कॅडेट कोअर पथक, वाहतूक शाखा पथक, पोलीस  बँड पथक, दंगल नियंत्रण पथक, श्वान पथक, जेलकैदी पथक वाहन, विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे पथक, वज्रवाहन, निर्भया पथक, फिरती न्याय वैद्दक प्रयोगशाळा, महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन वाहन, ईव्हीएम चित्ररथ, लोकशाही पंधरवडा चित्ररथ, सुधारीत क्षयरोग नियंत्रण चित्ररथ, जिल्हा परिषद दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान चित्ररथ, स्वच्छता अभियान चित्ररथ, सामाजिक वनीकरण राष्ट्रीय हरित सेना चित्ररथ यासह अन्य पथकांनी सहभाग घेतला.
समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, दलित मित्र, शिक्षक, नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन विजयदादा कडणे आणि पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा