शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

निराधार बेघरांना आधार देवून माणूसकीची वागणूक द्या - पालकमंत्री सुभाष देशमुख



-         सावली बेघर निवारा केंद्राचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते उद्घाटन

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : आज समाजात अनेकदा निष्ठूर मुले आपल्या विरूध्द आई-वडीलांना एकाकी सोडतात. ज्यांनी जन्म दिला, तळहातावरील फोडाप्रमाणे जपले, अशा आई-वडीलांना निराधार एकाकी सोडणाऱ्या पाल्यांवर संस्कारांची गरज असल्याचे सांगून निराधार बेघरांना आधार देवून, प्रेम देवून त्यांना माणूसकीची वागणूक द्या, असे आवाहन सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजिवीका अभियानांतर्गत आपटा पोलीस चौकीजवळ सांगली येथे सावली बेघर निवारा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, उपायुक्त स्मृती पाटील, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ज्यांना कोणीच नाही अशांना मदत उपलब्ध होईल असे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, हे निवारा केंद्र चालविणाऱ्या मुस्तफा मुजावर यांच्यासारखी माणसे समाजात तयार झाली पाहिजेत. निराधारांना मदत करण्याची भावना रूजली पाहिजे. एखादा बेघर रस्त्यावर विमनस्क स्थितीत आढळल्यास त्याच्याशी संवाद साधून या निवारा केंद्रामध्ये आणा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मुस्तफा मुजावर यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या प्रमाणेच संस्कार आजच्या तरूण पिढीवर होण्याची गरज व्यक्त केली.
इन्साफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर यांनी महापालिकेने सुरू केलेल्या निवारा केंद्रामुळे या कामाला अधिक चांगले पाठबळ मिळेल असे सांगून पुढील तीन महिन्याच्या कालावधीत एकही निराधार बेघर म्हणून रस्त्यावर राहणार यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. या निवारा केंद्रामध्ये उदरनिर्वाह, औषधोपचार, समुपदेशन आदि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा