शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

प्रत्येक माणसाला हक्काचे घर मिळावे यासाठी काम करा - पालकमंत्री सुभाष देशमुख



सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : सन 2022 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्काचे घर असावे हे स्वप्न घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काम करत आहेत. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक सामान्य, गरीब माणसापर्यंत ही योजना पोहोचवा. कोणीही बेघर राहू नये यासाठी काम करा. शेवटच्या माणसाला त्याच्या हक्काचे घर मिळवून द्या, असे प्रतिपादन सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका मुख्यालयात प्रधानमंत्री आवास योजना कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, उपायुक्त मौसमी बर्डे, उपायुक्त स्मृती पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, प्रधानमंत्री आवास योजना कमिटीचे अध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेला 100 कोटी रूपयांचा निधी दिल्याबद्दल पालकमंत्री या नात्याने त्यांचे आभार व्यक्त करून पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जनतेने ज्या विश्वासाने जबाबदारी दिली आहे तो विश्वास लोकप्रतिनिधींनी सार्थ ठरवावा. जनतेच्या अडीअडचणी सोडवाव्यात असे सांगितले. यावेळी त्यांनी 100 कोटी रूपयांच्या निधीतून करावयाच्या कामाचे प्रस्ताव त्वरीत शासनाला पाठवावेत. आवश्यक त्या मंजूऱ्या घेवून कामे गतीने दर्जेदार करावीत. केलेल्या कामांचा चांगला अभिप्राय जनतेतून मिळवावा म्हणजे शासनाकडून आणखी निधी मिळेल असे सांगितले. यावेळी त्यांनी अगदी तळागाळातील शेवटच्या घटकातील प्रत्येक माणसाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेसाठीचे अर्ज प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी स्विकारले.
प्रधानमंत्री आवास योजना कमिटीचे अध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांनी मनोगत व्यक्त केले. उपायुक्त स्मृती पाटील यांनी योजनेचे सादरीकरण केले. आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी महानगरपालिका करीत असलेल्या विविध कामांची माहिती दिली. आभार सभागृह नेता युवराज बावडेकर यांनी मानले.
यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा