शुक्रवार, १२ जुलै, २०२४

शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठीच्या बैठकीसाठी शिक्षकांना उपस्थित रहाण्याचे आवाहन

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन, नियोजनासाठी व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे. मिरज व तासगाव तालुक्यासाठी 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रासाठी 16 जुलै रोजी दुपारी 3 वाजता नव कृष्णा व्हॅली इंग्लीश मेडियम स्कुल कुपवाड या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 18 जुलै रोजी जत व कवठेमहांकाळ तालुक्यासाठी सकाळी 11 वाजता पी.डि.व्ही.पी. कॉलेज कवठेमहांकाळ येथे तर खानापूर व आटपाडी तालुक्यासाठी दुपारी 3 वाजता कि.क. गुळवणी माध्यमिक विद्यालय कडेगाव येथे, दिनांक 19 जुलै रोजी कडेगाव व पलुस तालुक्यासाठी सकाळी 11 वाजता मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव येथे तर शिराळा व वाळवा तालुक्यासाठी दुपारी 3 वाजता श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण-2012 अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित करावयाच्या भारतीय शालेय खेळ महासंघाव्दारे पुरस्कृत 93 खेळ प्रकारांचे आयोजन करण्यास शासनस्तरावर मान्यता प्रदान करण्यात आली आहे. 93 क्रीडा प्रकारापैकी 10 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा तालुकास्तरावर व इतर क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तर पासून घेण्यात येणार आहेत. इयत्ता 6 वी ते इयत्ता 12 वी मध्ये शिकत असणारे विद्यार्थी या शालेय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होवू शकतील, असे श्री. बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा