सोमवार, १ जुलै, २०२४

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते रोपे विक्री कक्षाचे उद्घाटन

सांगली, दि. 1 (जि.मा.का.) : सामाजिक वनीकरण विभाग व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रोपे विक्री कक्ष सुरु करण्यात आला असून या कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमास उप वनसंरक्षक निता कट्टे, सहायक उप वनसंरक्षक अजित साजने, सहाय्यक वनसंरक्षक रणजित गायकवाड, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, वनक्षेत्रपाल विक्रम गुरव यांच्यासह वन व सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी-कर्मचारी, उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते महिलांना वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. या कक्षामार्फत केंद्रशासनाद्वारे सुरु करण्यात आलेली योजना "एक पेड माँ के नाम" व राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली योजना "अमृत वृक्ष आपल्या दारी" या दोन योजना व सद्यस्थितीत सुरु असलेली वन महोत्सव कालावधीत वृक्ष लागवडीकरीता उपलब्ध रोपांची माहिती देऊन रोपे वाटप करण्यात येणार आहेत. रोप लागवड करण्याकरीता आवश्यक रोपे या कक्षावर व दोन्ही विभागातील रोपवाटीकेमध्ये उपलब्ध रोपे वन महोत्सव कालावधीत सवलतीच्या दरात मिळणार आहेत. रोपे विक्री कक्षामार्फत "अमृतवृक्ष" मोबाईल अॅप व वेब अॅप बाबतची माहिती देण्यात येणार असून जिल्ह्यात उपलब्ध रोपे, रोपवाटीकांचे स्थळ व रोपवाटीका समन्वयक आदींची माहिती एकाच ठिकाणी मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. "एक पेड माँ के नाम" व "अमृत वृक्ष आपल्या दारी या मोहिमेत सांगली जिल्ह्यातील नागरिक, निसर्गप्रेमींनी सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्षलागवड करावी व वृक्षांचे संगोपन करावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभाग व वन विभागामार्फत यावेळी करण्यात आले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा