गुरुवार, २५ जुलै, २०२४

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : सध्या सांगली जिल्ह्यामध्ये संभाव्य पूर परिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सर्व यंत्रणांनी आपापसामध्ये समन्वय ठेवून आपली जबाबदारी चोखरित्या पार पाडावी. या कामी हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिला. आपत्ती व्यवस्थापन विभागाची आज जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासनाने जनावरांसाठी चाऱ्यांची व्यवस्था करावी. निवारा केंद्रात स्थलांतरित लोकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच त्या ठिकाणी आरोग्यविषयक सुविधा देण्यात याव्यात. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी आपले फोन 24 तास सुरू ठेवावेत तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आपत्तीच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घ्यावे. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये तसेच आपत्ती कालावधीत रजा घेऊ नये. प्रत्येक अधिकारी फिल्डवर पाहिजे अशा सूचना करून जिल्ह्यातील ताकारी, टेंभू-म्हैसाळ या योजनेतून सांगली तसेच सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तालुक्यांना पाणी सोडावे, असे निर्देश ही त्यांनी या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने महसूल, पोलीस, जिल्हा परिषद तसेच एसटी विभागाशी संपर्क साधून जिल्ह्यातील बंद रस्त्याबाबत माहिती घ्यावी. त्याचबरोबर बाधित नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये मुख्याध्यापकांची सेवा घेण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेषत: गरोदर स्त्रियांची योग्य काळजी घ्यावी तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने, नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. आरोग्य विभागाने आपत्कालीन स्थितीत आरोग्य विषयक सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवावी असे निर्देश दिले. तर पूर बाधीत ग्रामीण भागांमध्ये निवारा केंद्राची आवश्यकतेनुसार उभारणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी दिली. त्याचबरोबर सांगली मनपाकडून आपत्कालीन परिस्थितीच्या निवारणार्थ केलेल्या उपाययोजनांची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी यावेळी दिली. प्रारंभी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ यांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती प्रास्ताविकामध्ये दिली. या बैठकीसाठी संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांसह इतर अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा