सोमवार, १५ जुलै, २०२४

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे तसेच त्यांच्या सशक्तीकरणास चालना मिळावी या उद्देशान महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वीत केली आहे. या योजनेपासून सांगली जिल्ह्यातील एकही पात्र महिला वंचित राहता कामा नये, असे निर्देश कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, महानगरपालिका उपायुक्त शिल्पा दरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे पुढे म्हणाले, या योजनेची अंमलबजावणी करत असताना कोणी पैशाची मागणी केल्यास त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. विंशेषत: ग्रामीण भागात या योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी रिक्षाव्दारे प्रसिध्दी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत या योजनेच्या परिपूर्ततेसाठी तसेच या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सांगली जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रारंभी या योजनेसंदर्भात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी सादरीकरण केले. तर योजनेपासून कोणतीही पात्र महिला वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिली. या बैठकीसाठी तहसिलदार लिना खरात यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा