बुधवार, ३१ जुलै, २०२४

. . .तिथे कर माझे जुळती !

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : गेल्या चार-पाच दिवसापासून जिल्ह्यात काही तालुक्यातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो. सुदैवाने सध्या सांगलीकरांची पूरस्थिती टळली असली तरीही भारतीय सेनादलाची तुकडी डोळ्यात तेल घालत कार्यरत आहे. ज्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सुमारे 100 जणांची भारतीय सैन्य दलाची तुकडी बोलावली होती ती तुकडी आपल्या कर्तव्यापासून तसभूरही मागे हटले नाही अथवा त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली नाही. त्याचे झाले असे की , सांगलीतील मगरमच्छ कॉलनीतील रहिवाशांना पुराच्या पाण्यामुळे बाहेर जाता की आत येता येत नव्हते. अशा आव्हानात्मक स्थितीत सैन्यदलाच्या तुकडीतील काही सैनिकांनी त्यांना जेवणाचे तसेच जेवण तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्याची पाकिटे वितरित केली तसेच सैन्यदलाच्या वैद्यकीय चमुने त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची काळजी घेत त्यांच्या आरोग्य विषयक बाबींची तपासणी केली. भारतीय सैन्यदलाच्या या निरपेक्ष कृतीने बाधित नागरिकांच्या चेहऱ्यावर मनस्वी आनंद पसरला. भारतीय सैनिक हे केवळ सीमेचेच रक्षण करतात असे नाही तर मानवीय भाव -भावनांच्या सीमेचेही रक्षण त्यांनी केले यात शंका नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते की , . . . तेथे कर माझे जुळती ! 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा