शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

मातंग समाजासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचा आधार

महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग तत्सम समाजातील लोकांचे जीवनमान उंचाविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना कंपनी कायदा अधिनियम, 1956(1) च्या तरतुदीनुसार सामाजिक न्याय विभाग अंतर्गत दिनांक 11 जुलै 1985 रोजी केली आहे.
मातंग समाजासाठी लेखणीद्वारे खऱ्या अर्थाने सामाजिक प्रगतीची प्रेरणा निर्माण करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने स्थापन झालेल्या या महामंडळाद्वारे मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी मादिगा या 12 पोट जातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते.
विशेष केंद्रीय अर्थ सहाय्य योजना
   लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष केंद्रीय अर्थ सहाय्य योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजार पर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान देण्यात येते. प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येते. अनुदान वगळून बाकीची सर्व रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी होते. कर्ज फेड 36 ते 60 मासिक हप्त्यात करावी लागते. तांत्रिक व्यावसायीक प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शासनमान्य संस्थांना प्रशिक्षणार्थी देण्यात येतात. प्रशिक्षणाचा कालावधी सहा ते बारा महिने असतो.
   तांत्रिक व्यावसायिक प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीची प्रति प्रशिक्षणार्थी 2 हजार 500 रुपये फी आहे. संगणक प्रशिक्षणासाठी एकूण प्रशिक्षण कालावधीची प्रति प्रशिक्षणार्थी 3 हजार 500 रुपये फी आहे. वाहन चालक प्रशिक्षणासाठी एकूण प्रशिक्षण कालावधीची प्रति प्रशिक्षणार्थी फी चारचाकी वाहनासाठी 2 हजार 300 रुपये तर तीन चाकी वाहनासाठी 2 हजार रुपये आहे. ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीची प्रति प्रशिक्षणार्थी फी 3 हजार 500 रुपये तर शिवणकला प्रशिक्षणाच्या एकूण कालावधीची प्रति प्रशिक्षणार्थी फी 1 हजार 200 रुपये आहे. प्रशिक्षणार्थी रहात असलेल्या ठिकाणीच प्रशिक्षण घेत असल्यास प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 150 रूपये, महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीस दरमहा 250 रुपये प्रशिक्षणार्थी रहात असलेल्या खेड्यात / शहराव्यतिरिक्त अन्य खेड्यात/शहरात प्रशिक्षण घेत असल्यास प्रतिमहा 300 रुपये फी व्यतिरिक्त विद्यावेतन दिले जाते.
बीज भांडवल योजना
   बीज भांडवल योजनेंतर्गत 50,001 ते 7 लाख रुपयांपर्यंत प्रकल्प मर्यादा आहे. 50,001 ते 7 लाख रुपयेपर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणांमध्ये 10 हजार रुपये अनुदान वगळता उर्वरित कर्ज राशीमध्ये 5 टक्के अर्जदाराचा सहभाग, 20 टक्के महामंडळाचे कर्ज (10 हजार रुपये अनुदानासह), 75 टक्के बँकेचे कर्ज अशी कर्जाची विभागणी असते. बँक कर्जाची परतफेड बँकेच्या व्याजासह बँकेकडे करावयाची असून महामंडळाचे कर्ज द.सा.द.शे. 4 टक्के व्याजासह महामंडळाकडे परत फेड करावयाचे आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मातंग समाजातील इयत्ता दहावी, बारावी, पदवी पदविका अभियांत्रिकी वैद्यकीय परीक्षेत कमीम कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी विद्यार्थिंनी यांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार निवड केली जाते. उपलब्ध निधीच्या मर्यादेत शिष्यवृत्ती एकदाच प्रोत्साहनपर दिली जाते. दहावी 1 हजार रुपये, बारावी 1 हजार 500 रुपये, पदवी पदविका 2 हजार रुपये तर अभियांत्रिकी वैद्यकीयसाठी 2 हजार 500 रुपये शिष्यवृत्ती आहे.
                                                शंकरराव पवार
जिल्हा माहिती कार्यालय

सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा