गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

जलयुक्त शिवार योजनेमधून विभूतवाडीची चमकदार कामगिरी

आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी हे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणारे सांगली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचे गाव. दुष्काळाचा सामना करणारेे मात्र, ही परिस्थिती बदलण्यासाठी गावकऱ्यांनी एकीची मोट बांधली. प्रशासन आणि जनतेने हातात हात घालून जलसंधारणाची कामे केली. विभूतवाडीतील बदलाची ही कहाणीी
विभूतवाडीची लोकसंख्या 2 हजाराच्या आसपास आहे. गावात एक पाझर तलाव आणि एक लघुपाटबंधारे तलाव आहे. परंतु, गेल्या 10 वर्षांपासून या गावाला  दुष्काळाचा फटका बसला आहे. पूर्वी गावात पाण्याच्या उत्तम सोयी होत्या. पण या दुष्काळामुळे ओढा पूर्णपणे आटला. या दुष्काळावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी जलसंधारणाचे काम हाती घेत गावातील ओढ्याचे काम करायचा निर्णय घेतला. प्रशासनाने जलयुक्त शिवार अभियानाची साथ या निर्णयाला दिली. या गावामध्ये जलयुक्त शिवार अभियान, लोकवर्गणी, महात्मा गांधी रोजगार हमी योजना यामधून ओढापात्राचे जवळपास तीन ते साडेतीन किमीचे काम पूर्ण झाले आहे. आता प्रतीक्षा आहे ती परतीच्या पावसाची.
समाजकल्याण सभापती कुसुम नाना मोटे, पंचायत समिती सभापती सुमनताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी विशेष प्रयत्न करून तत्परतेने या कामाला गती दिली. सरपंच शैला भिसे आणि ग्रामसेवक दत्ता गळवे यांनी या कामासाठी लोकसहभाग मिळवण्यासाठी ग्रामस्थांचे मन वळवले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून 15 हजार 600 घनमीटर आणि लोकसहभागातून 5 हजार घनमीटर असा एकूण 20 हजार 600 गाळ काढण्यात आला. यामधून 20.6 टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे.
याबाबत गटविकास अधिकारी मीना साळुंखे म्हणाल्या, या कामाअंतर्गत सर्वप्रथम ओढा स्वच्छ करुन घेतला. या ओढ्यातील काट्या काढून ओढ्याचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यात आले.
उपअभियंता बी. बी. हुक्किरे म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेमधून झालेल्या या कामात काही ठिकाणी 45 मी. तर काही ठिकाणी 25 मी. याची रुंदी आहे, खोली साधारण 2 मी., 2.5 मी., 3 मी. असे काम झाले आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाचे पाणी ओढ्यात साचले. चांगला पाऊस झाल्यास ओढापात्रात सुमारे 20.6 टीसीएम पाणीसाठा होईल. यामुळे पात्राशेजारच्या विहीर कूपनलिकांची पाणीपातळी वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सचिन भिसे म्हणाले, आम्ही गावातील सर्व लोक एकत्र येवून एक निर्णय घेतला कि, सर्वप्रथम या ओढ्यातील काट्या काढायच्या आणि खोलीकरण, रुंदीकरण करायचे. यासाठी लोकवर्गणी हे पहिले माध्यम आम्ही हातात घेतलो. लोकवर्गणी गोळा करत आमच्या गावचे ग्रामसेवक दत्तात्रय गळवे यांनी आम्हाला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्यापर्यंत पोहोचवले. आम्ही त्यांना आमची व्यथा सांगितली, गावाला पाणी नाही. साळुंखे मॅडमनी आमचा प्रश्न उचलून धरला आणि जलयुक्त शिवार मधून रोजगार हमीच्या माध्यमातून निधी देवून 3.5 कि.मी.चा ओढा आम्ही साफ केला. ओढ्यावर ठिकठिकाणी बांध पडले आहेत. एक पाऊस झाला. याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी यामध्ये साठले होते. या पाण्याचा बऱ्यापैकी उपयोग झाला. पाणी साठले ते त्या जागेवर मुरले. आता जर परतीच्या पावसाने ओढा भरला तर 2 वर्ष तरी आम्हाला कुठल्याही पाण्याची गरज लागणार नाही, म्हणजे या कामातून आम्ही स्वतः आमची सोय केली, असे आम्हाला वाटते, असे आनंदोद्गार त्यांनी व्यक्त केले.
याबाबत स्थानिक शेतकरी जालंदर कोडींबा खर्जे म्हणाले, या जलयुक्त शिवार मधून आम्हाला सध्या थोडाफार फायदा झाला असला तरी भरपूर पाऊस पडल्यानंतर ओढापात्र भरेल आणि याचा आणखी चांगला फायदा होणार आहे. तसेच विहिरी, बोअरवेलला पाणी वाढेल.
स्थानिक नागरिक बापू विठ्ठोबा मोटे म्हणाले, जलयुक्त शिवारचे चांगल्या प्रकारे काम झाले आहे. आम्हाला भविष्यात ओढा खोदीकरणाचा किंवा मध्ये जे बांध घातलेत, याचा उपयोग होईल. कमीत कमी 1 वर्ष पाऊस आला आणि ओढा भरुन गेला तर त्या पाण्याचा उपयोग 2 वर्ष तरी राहील. त्यामुळे आमचे गाव, शेतकरी चांगले सुधारलेले दिसतील.
ही सर्व यंत्रणा केवळ ओढापात्राचे काम करून थांबले नाहीत. ओढ्याच्या पात्रात पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून पात्राच्या दुतर्फा कमी पाण्यावर वाढणारी झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाळ काढलेल्या ओढ्याच्या पात्रात ठिकठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाणी अडविण्यापेक्षा पाणी जमिनीत मुरवण्यावर भर दिला जाणारा आहे. त्यासाठी इस्त्रायलच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. गावातील ओढ्याला येऊन मिळणारे सारे ओहोळही स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
एकूणच गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी एकत्रित प्रयत्नांनी गावाची पाण्याची गरज भागवण्यासाठी प्रयत्न केला आणि शासकीय योजना यशस्वी करण्यात आम्हीही मागे नाहीत, हे स्पष्ट केले आहे.
संप्रदा द. बीडकर
प्र. जिल्हा माहिती अधिकारी
                                                         

सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा