शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी जाणीव जागृती आवश्यक - अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे

सायबर जनजागृती कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

    सांगली, दि. 25 (जि. मा. का.) :-  समाजमाध्यमांमुळे देशाच्या सीमारेषा पुसून गेल्या असून, लोक जवळ आले आहेत. मात्र, वाढत्या इंटरनेट वापरामुळे सायबर गुन्हेगारीच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांचा पैसा आणि गोपनीयता याला मोठा धोका निर्माण झाला आहे. इंटरनेटचे तंत्रज्ञान वारंवार बदलत असल्याने सायबर गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. अशा कार्यशाळांचे आयोजन त्यासाठी मदतीचे ठरेल, असे प्रतिपादन सांगली जिल्हा अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी आज येथे केले.
      ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत सायबर जनजागृती अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. व्ही. ताम्हणकर, आयसीआयसीआय बँकेच्या रिजनल ग्रुपचे विनायक राजाध्यक्ष, फायनान्शियल क्राईमचे रिजनल मॅनेजर सुमित महाबळेश्वर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा पोलीस दल जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विलिंग्डन महाविद्यालयातील वेलणकर सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला.
         अपर पोलीस अधिक्षक शशिकांत बोराटे म्हणाले, समाजमाध्यमांच्या गैरवापरामुळे सायबर गुन्हेगारीचा आलेख उंचावतोय. अशा वेळी आपल्या गोपनीय माहितीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना तसेच समाजमाध्यमांचा वापर करताना आपल्या जबाबदारीचे भान राखावे. फोनद्वारे कोणतीही बँक संदर्भातील माहिती अथवा आपली व्यैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये. ऑनलाईन व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्यावी. कोणासही आपला ओटीपी क्रमांक देऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
    प्राचार्य बी. व्ही. ताम्हणकर म्हणाले, जेवढा तंत्रज्ञानाचा वापर अधिक केला जातो, तेवढेच त्याचे धोके आहेत. हे धोके कमी व्हावेत नागरिकांच्या गोपनीय माहितीचे, संपत्तीचे संरक्षण व्हावे, समाजमाध्यमांचा गैरवापर सुजाण नागरिकांकडून जाणते-अजाणतेपणी होऊ नये, यासाठी सायबर जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन ही काळाची गरज आहे.
        आयसीआयसीआय बँकेच्या रिजनल ग्रुपचे विनायक राजाध्यक्ष यांनी सादरीकरणाद्वारे माहिती देतांना सायबर गुन्ह्यांची ओळख, सायबर गुन्ह्यांचे प्रकार, सोशल मीडिया, सायबर गुन्ह्यांचे स्वरुप, हॅकिंग, सायबर गुन्हा घडल्यानंतर काय करावे, सायबर गुन्हे रोखण्याच्या उपाययोजना, नागरिकांची कर्तव्ये, समाजमाध्यमे वापरताना घ्यावयाची पूर्वकाळजी याबाबत मार्गदर्शन केले. कोणतेही ऍ़प डाऊनलोड करताना त्यांचे नियम अटी वाचत नाही. त्यामुळे त्यांना आपण नकळत स्वतःचा मोबाईल वापरण्याची परवानगी देतो. ते आपली माहिती इतरांना विकतात. त्यामुळे कोणतेही ऍ़प वापरताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
    फायनान्शियल क्राईमचे रिजनल मॅनेजर सुमित महाबळेश्वर यांनी डिजिटल, ऑनलाईन, मोबाईल बँकिंग, त्यातील तांत्रिक बाबी,  त्याची सुरक्षितता, ऑनलाईन बँकिंग व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, होणाऱ्या फसवणुकीचे विविध प्रकार, डेटा चोरीची माध्यमे त्यापासून घ्यावयाची खबरदारी, एटीएम मधून पैसे काढताना घ्यावयाची सतर्कता, ई-मेल द्वारे येणारे परदेशी लॉटरी जिंकल्याचे आमिष त्या माध्यमातून होणारी फसवणूक, करावयाच्या आणि करावयाच्या बाबी यांची माहिती दिली.
        प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला. सूत्रसंचालन आभार वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री माळी यांनी मानले.
    कार्यशाळेस नागरिक, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी,  माध्यमांचे प्रतिनिधी, सायबर शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.     
    कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सायबर सेलचे श्री माळी, आदिंनी परिश्रम घेतले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा