शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी आतापासूनच पाणी आरक्षित करून ठेवावे - पालकमंत्री सुभाष देशमुख

जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती सभेत सूचना
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : पाणीटंचाईकाळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पाणी आरक्षित करून ठेवावे, अशा सूचना सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिल्या.
जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे अधीक्षक अभियंता जीवन गरंडे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवताना उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई स्थिती लक्षात घेता, उपसा सिंचन योजनेतून तलाव पुन्हा भरून घ्यावेत. या माध्यमातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच, टँकर कमी होऊन शासनाचेही पैसे वाचणार आहेत.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, गावांना आवश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घ्यावी. तालुकानिहाय ही गरज लक्षात घेऊन, प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा, उपलब्ध असलेला सध्याचा साठा, साठवण तलावाची क्षमता आणि आवश्यक पाणी आरक्षण यांचा सारासार विचार करून पिण्याचे पाणी आरक्षित करून ठेवावे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा