शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

मतदारयादी पुनरिक्षण व मतदार जनजागृतीसाठी जिल्ह्यात प्रभावी काम - जिल्हाधिकारी वि. ना. काळम

- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मानवी साखळी सायकल रॅली उत्साहात संपन्न
- सहस्त्रक नवमतदार दिव्यांग मतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप

   सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावावा. 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक युवक-युवतीने मतदार नोंदणी करावी. यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारयादी पुनरिक्षण मतदार जनजागृतीसाठी सांगली जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. याबाबत निवडणूक आयोगाने समाधानही व्यक्त केले आहे, असे प्रशंसोद्‌गार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अमृत नाटेकर आणि शंकरराव भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत बीएलओ यांच्याबरोबरच महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी चांगली कामगिरी केली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, बीएलओंनी निवडणूक कामामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच, मतदान बजावणे हे पवित्र कार्य आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक मताचे मोल अनमोल असून आपल्या एका मतामुळे आपण राष्ट्र उभारणीचे काम करीत असतो. मतदानाचा अधिकार ज्यांना प्राप्त झाला आहे, अशा नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते ज्यांचा जनम् 1 जानेवारी 2000 रोजी झाला आहे, असे सहस्त्रक नवमतदार दिव्यांग मतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांचा संदेश चित्रफीतीद्वारे दाखवण्यात आला. तसेच, उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ देण्यात आली. मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामकाज केलेल्या बीएलओंना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. तसेच रांगोळी, निबंध, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पथनाट्यमधील सहभागींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
    प्रास्ताविक स्वागत उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले. आभार जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी मानले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच इतर शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवी साखळी सायकल रॅली उत्साहात
दरम्यान, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित मानवी साखळी सायकल रॅलीला सांगलीकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी स्टेशन चौक येथे हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सायकल रॅलीस प्रारंभ झाला. स्टेशन चौक ते पुष्कराज चौक परत स्टेशन चौक अशी सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
    या मानवी साखळी सायकल रॅलीमध्ये विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनसीसी विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांनी सहभाग नोंदविला. यावेळी मतदार जनजागृतीसाठी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. मानवी साखळी तसेच सायकल रॅलीप्रसंगी  "मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आणि ते मी निष्ठेने पार पाडणारच", "जो कर्तव्य बुध्दीने करी मतदान, तोच खरा देशभक्त महान", "मतदान हे पवित्र दान, लागू नये त्याला कसलीच घाण" अशा बॅनर्सद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थितांना प्रतिज्ञा  देण्यात आली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा