शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

तरूणांनी नोकरी मागण्याऐवजी व्यवसायाद्वारे इतरांना नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात - पालकमंत्री सुभाष देशमुख

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शन मेळाव्यात प्रतिपादन

    सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : तरूणांनी ताठ मानेने आणि स्वाभीमानाने जगण्यासाठी भावी काळात नोकरी मागण्याऐवजी स्वतःचे विविध व्यवसाय उभारावेत. या माध्यमातून इतरांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून द्यावी. यासाठी शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजनेबरोबरच अनेक कर्ज योजना आहेत. तसेच, विविध महामंडळांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचे व्याज आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भरण्याबाबत शासन स्तरावर विचार सुरू आहे, असे प्रतिपादन सहकार, पणन  वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
    इस्लामपूर येथे आयोजित अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, राहुल महाडिक, वैभव शिंदे, बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रम पाटील आदि उपस्थित होते.
    पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, देशातील तरूणांच्या संख्येत तुलनेत प्रत्येकाला शासकीय नोकरी देणे शक्य होणार नाही. बेरोजगारीच्या प्रश्नावर मात करायची असेल तर प्रत्येकाच्या हाताला काम आणि काम उपलब्ध करून देणारे हात निर्माण होणे आवश्यक आहे. नोकरीपासून वंचित असलेल्या तरूणांना विविध कौशल्य मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून केंद्र शासनाने 3 लाख तरूणांना 300 कोटी रुपये खास बाब म्हणून मंजूर केले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्याच्या मुलांनी तसेच, अन्य युवकांनी त्यांनी हे प्रशिक्षण घेऊन आपापल्या क्षमतेप्रमाणे व्यवसाय सुरू करावा इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा. कर्ज पुरवठा झाल्यानंतर मात्र हप्त्यांची वेळेत परतफेड करावी. त्याचे व्याज महामंडळ भरेल अशी व्यवस्था करण्यात येत आहे, असे त्यांनी यावेळी   स्पष्ट केले.
            आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वच तरुणांना पूर्वीप्रमाणे नोकरी मिळत नाही आणि उद्योग करायला तरुण तयार झाले पाहिजेत. शिपाई पदासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणारे अर्ज करीत आहेत. शासनाच्या नवी ध्येय-धोरणांची माहिती तरूणांपर्यंत पोहोचली पाहिजे. मुद्रा योजना छोट्या व्यवसायिकांना आधार ठरत आहे. योग्य प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी सर्वाधिक लाभ घेत निधी खर्च केला आहे. स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणावर अधिकारी बनत आहेत. मराठा समाजाला एक वेगळी प्रतिष्ठा आहे ती टिकवण्यासाठी प्रयत्न हवेत, असे ते म्हणाले.
    स्वागत प्रास्ताविक विक्रम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विजय लोहार यांनी केले. एस. के. पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा