शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

सेंद्रिय शेती, मातीपरीक्षण आणि ठिबकवरील ऊसशेती काळाची गरज - पालकमंत्री सुभाष देशमुख

वसंत पाणीपुरवठा सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन
    सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : अतिरीक्त पाणी, रासायनिक खते यांच्या माऱ्यामुळे जमीन  क्षारपड होण्याचा धोका आहे. भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता, 100 टक्के ठिबक सिंचनवरील ऊसशेती आणि सेंद्रिय शेती करणे काळाची गरज बनली आहे. ऊसशेतीमध्ये ठिबक सिंचनासाठी राज्य शासन 4 टक्के अनुदान देते. याचा लाभ घ्यावा. तसेच मातीपरीक्षणही करून घ्यावे, असे आवाहन सहकार, पणन  वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
      वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि. नागनाथअण्णा नगर पुरस्कृत वसंत पाणीपुरवठा सहकारी संस्थेच्या नूतन वास्तू उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, वसंत पाणीपुरवठा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संभाजी पाटील, उपाध्यक्षा शांता घारे, कार्यकारी संचालक सुभाष देशमुख, विक्रम पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
      वसंत पाणीपुरवठा सहकारी संस्थेच्या उभारणीत वैभव नायकवडी यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगून  पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, या पाणीपुरवठा संस्थेचे कार्यालय कार्पोरेट आहे. यापुढे संस्थेने उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत. तसेच, संस्थेच्या माध्यमातून गावाची, समाजातील शेवटच्या घटकाची गरज ओळखून सामाजिक बांधिलकी जपावी. आरोग्य, शिक्षण आदि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करावे. तसेच, कर्ज शासन माफ करेल, अशी अपेक्षा सोडून देऊन भूविकास बँकेकडील थकित कर्ज भरावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
      यावेळी वैभव नायकवडी, प्रकाश अष्टेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे पदाधिकारी सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत प्रास्ताविक कार्यकारी संचालक सुभाष देशमुख यांनी केले. यावेळी विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, गोटखिंडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा