शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थीयादीत पात्र, गरजूंचा समावेश करा - पालकमंत्री सुभाष देशमुख

जिल्हास्तरीय दक्षता समिती सभेत दिल्या सूचना

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र आणि गरजू नागरिक लाभापासून वंचित राहू नयेत. त्यांचा समावेश लाभधारकांच्या यादीमध्ये करून घ्यावा. तसेच, जुन्या जीर्ण शिधापत्रिका बदलून द्याव्यात. या सर्व बाबींचा तालुकानिहाय आढावा घेऊन कार्यवाही करावी, अशा सूचना सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिल्या.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता समिती सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांच्यासह समितीचे शासकीय, अशासकीय सदस्य उपस्थित होते.
स्वस्त धान्य दुकानांमध्ये नागरिकांना तूरडाळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये पॉस मशीन अनिवार्य करा. तसेच, आधार जोडणी 100 टक्के करा. तसेच, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत  गॅस कनेक्शन देऊन जिल्हा धूरमुक्त करण्यासाठी निकषांमध्ये काही बदल करणे आवश्यक असल्यास त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करावा, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांनी 100 टक्के पॉस मशिनद्वारे धान्य वितरण करणे अपेक्षित आहे. जे स्वस्त धान्य दुकानदार शासनाच्या या योजनेला प्रतिसाद देणार नाहीत, त्यांची तपासणी करून कारवाई करा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा