गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

बीज भांडवल योजनेतून आकाश मेटकरींनी थाटले दुकान

केंद्र शासनाच्या रोजगार निर्मितीसाठीच्या योजनांचा लाभ घेऊन अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी स्वतःचे आयुष्य सजवले आहे. कुपवाडमधील आकाश आबासाहेब मेटकरी त्यापैकीच एक. प्रधानमंत्री बीज भांडवल योजनेचा लाभ घेऊन आज त्यांनी स्वतःचे कपड्यांचे दुकान थाटले आहे.
आकाश मेटकरी यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. काही काळ खो-खोची प्रॅक्टिसही केली. त्यातून त्यांना पोलीस भरतीची आशा होती. त्यांनी पोलीस भरतीसाठी दोन तीनदा प्रयत्न केले. परंतु, यश मिळाले नाही. मात्र, नाउमेद होता त्यांनी स्वतःच प्रयत्न करायचे ठरवले.
आकाश मेटकरी यांनी घरातूनच पुरूषांसाठी स्पोर्टस् वेअरचा व्यवसाय सुरू केला. ओळखी निर्माण झाल्या. त्यामुळे स्वतःचे दुकान असावे, अशी त्यांची इच्छा होती. व्यवसाय वाढवण्यासाठी पैशांची गरज होती. प्रश्न होता तो भांडवलाचा. त्यांची ही गरज प्रधानमंत्री बीज भांडवल योजनेतून पूर्ण झाली. त्यावेळी त्यांना उद्योग केंद्रामध्ये बीज भांडवल योजनेची माहिती मिळाली. त्यातून माहिती घेऊन बीज भांडवलसाठी अर्ज केला. जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे त्यांना दोन लाख रुपये कर्ज मिळाले.
कर्ज मिळाल्यानंतर आकाश मेटकरी यांनी कॉलेज कॉर्नर येथे भाडेतत्त्वावर एक गाळा घेऊन डी स्पोर्टस् अँड मेन्स वेअर हे स्वतःचे दुकान सुरू केला. अपेक्षेप्रमाणे जम बसू लागल्यानंतर स्पोर्टस्‌वेअर बरोबर मेन्सवेअरही सुरू केले. आता त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. हळूहळू प्रगती सुरू आहे. कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शासन आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

वर्षा पाटोळे
जिल्हा माहिती अधिकारी,
सांगली

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा