शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

विक्रीकर विभाग विविध कल्याणकारी योजनांचा पाईक - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

जी. एस. टी. भवनचे दिमाखदार उद्घाटन

     सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : वस्तू सेवा कर विभाग हा मंत्रालयाचे हृदय आहे. हा विभाग कल्याणकारी योजनांचा पाईक आहे. आता कर संकलनात सरलता, सुलभता आली असून, कर भरताना व्यापारी, उद्योजकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिले.
वस्तू सेवा कर विभागाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन लोकार्पणानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषि, फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, वस्तू सेवा कर विभागाचे राज्य आयुक्त राजीव जलोटा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अपर राज्यकर आयुक्त विलास इंदलकर आणि चंद्रहास कांबळे, राज्य कर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्य कर उपायुक्त योगेश कुलकर्णी, अशोक सानप आणि शर्मिला मिस्कीन आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या विभागाची आण, बाण, शान वाढवत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सर्व विभागांमध्ये सर्वप्रथम आय. एस. ओ. मानांकन मिळवणारा हा विभाग झाला आहे. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा रत्नागिरी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योगदान दिल्याबद्दल अभिनंदन करतो. आय. एस. ओ. प्रमाणपत्र हा केवळ एक कागद नसून उत्तम काम करण्याची प्रेरणा आहे. यामुळे विभागाची जबाबदारी वाढली असून, यापुढेही सर्वांनी चांगले अचूक काम करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विक्रीकर विभाग आईच्या भूमिकेत असून, परिवारातील इतर सदस्यांची काळजी घेणारा आहे. अन्य विभागांना वित्तपुरवठा व्हावा, अर्थसंकल्पातील उत्तम तरतुदी त्या विभागांना मिळाव्यात, यासाठी हा विभाग परिश्रम करतो. शेवटच्या व्यक्तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे ईश्वरीय कार्य या विभागाचे अधिकारी, कर्मचारी करतात. त्यामुळे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्याचा सन्मान व्हावा, चुकीचे काम करणाऱ्याला परावृत्त करा.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वस्तू सेवा कर संकलनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. त्यामुळे जी. एस. टी कौन्सिलमध्ये राज्याच्या जी. एस. टी विभागाचा सन्मान केला गेला. हा सन्मान सर्वांचा आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याला 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत महसूल लक्ष्यांक 203.26 कोटी रूपये इतका होता प्रत्यक्ष वसुली 228.35 कोटी रूपये इतकी झाली, याबद्दल धन्यवाद देऊन अभिनंदन केले. यापुढेही सांगली कार्यालयाने उद्दिष्ट पार करून उद्दिष्टापेक्षा जास्त  कर संकलन करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जी. एस. टी. भवन कार्यालयाकडे इमारत म्हणून पाहता कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यापारी उद्योजकांना चांगली सेवा दिली पाहिजे. व्यापारी, उद्योजक जी. एस. टी चे मार्गदर्शन घ्यायला येतो, तेव्हा त्याला सौजन्याची, नम्रतेची वागणूक द्यावी. जी. एस. टी कायद्याच्या माध्यमातून वन नेशन, वन मार्केट, वन टॅक्स ही संकल्पना ठेवत व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी खासदार संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आय. एस. ओ. मानांकनात योगदान दिलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
या इमारतीचे क्षेत्रफळ 2657.95 चौरस मीटर असून यामध्ये अधिकारी कक्ष 33, कर्मचारी व्यवस्था 75 इतर सुविधांमध्ये महिला अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता कक्ष तसेच संगणक प्रयोग शाळा 110 आसन क्षमतेचे सर्व सोयींनी युक्त वातातुकुलित सभागृह अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीसाठी 5.25 कोटी इतका खर्च झाला असून फर्निचरसाठी 1.20 कोटी इतका खर्च झाला आहे. सांगली वस्तू सेवा कर कार्यालयास वस्तू सेवा करांंतर्गत एकूण 17 हजार 258 इतके करदाते वर्ग करण्यात आले आहेत.
आयुक्त राजीव जलोटा यांनी प्रास्ताविकात जी. एस. टी. विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. आभार योगेश कुलकर्णी यांनी मानले. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.
यावेळी विविध उद्योजक, व्यापारी, विक्रीकर विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा