बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून जोत्स्ना पाटील यांच्या व्यवसायाला गती

शिक्षण घेऊन नोकरी करण्याच्या मानसिकतेला छेद देत उद्योग व्यवसाय उत्तम रीतीने यशस्वी करणारे अनेक उद्योजक, व्यावसायिक आहेत. सांगलीच्या विश्रामबाग येथील जोत्स्ना उत्तम पाटील आणि उत्तम श्रीमंत पाटील हेही त्यापैकीच एक. त्यांचा प्रथमेश इलेक्ट्रॉनिक्स या नावाने बल्बच्या माळा तयार करण्याचा उद्योग आहे.
कर्नाटकमधील मंगसुळी हे पाटील यांचे गाव. तिथे 1982 पासून डेकोरेशनची बल्बच्या माळा लावण्याचा व्यवसाय करत होते. हे काम ते मजुरीवर करत. मात्र, तिथे दुष्काळ पडल्यामुळे ते सांगलीत आले. सांगलीतही हा व्यवसाय मजुरीवर करू लागले. त्यावेळी परिस्थिती नसल्याने त्यांना कर्ज मिळू शकले नाही. पण, त्यांनी जिद्द सोडली नाही.
दोन वर्षांपूर्वी त्यांना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती मिळाली. जोत्स्ना पाटील यांनी पतीला साथ देण्यासाठी या योजनेतून कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यातून त्यांना 20 लाख रुपये कर्ज मिळाले. कर्ज मिळाल्यानंतर मजुरीवर काम करणे त्यांनी थांबवले. त्यांनी स्वतःचा एल डी बल्बच्या माळा तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
यासाठी लागणारा कच्चा माल ते मुंबईतून आणतात. इतरांना रोजगार देत आज त्यांच्याकडे 5 ते 6 कामगार आहेत. त्याचबरोबर एल डी बल्बच्या माळांसाठी लागणाऱ्या कापडी पट्‌ट्या शिवण्यासाठी बचतगटांच्या 51 महिलांना त्यांनी रोजगार दिला आहे. बाराही महिने त्यांचा हा व्यवसाय आहे. डेकोरेशनसाठी लागणारे लाईटिंग करण्यासाठी ते एलईडी माळा पुरवतात. तयार झालेल्या माळांना मुंबई, पुणे, गोवा, बेळगाव, सोलापूर, बंगळुरू, यवतमाळ यासह राज्याबाहेरही मागणी आहे.
याबाबत जोत्स्ना पाटील म्हणाल्या, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी आम्हाला 20 लाख रुपये कर्ज मिळाले. त्यामुळे आमच्या व्यवसायाला आणि जीवनाला गती मिळाली आहे. गेल्या दोन वर्षांत या कर्जातील सहा ते साडेलाख रुपये आम्ही फेडले आहेत. आम्हाला योजनेतून 5 लाख रुपये सबसिडीही मिळाली आहे. त्यामुळे आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आता दोन पावले पुढे टाकत आम्ही स्वतःचा कारखाना सुरू करणार आहोत. त्याचबरोबर आमचा माल गुणवत्तापूर्ण असल्याने निर्यात कऱण्यासाठीही आमचा प्रयत्न मानस आहे. त्यासाठी नियोजन सुरू असून, आम्ही आयात निर्यात परवाना काढला आहे. आम्हाला कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शासन तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी नितीन कोळेकर, विद्या कुलकर्णी, त्यांचे सहकारी यांचे मनापासून आभारी आहोत.
विशेष म्हणजे पाटील दांपत्याने मुलगा प्रथमेशलाही याच व्यवसायाचा पाया तयार करून ठेवला आहे. प्रथमेश सध्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तर मुलगी प्राजक्ता दहावीत आहे. या चौकोनी कुटुंबाला प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ मिळाल्याने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन आले आहे. पूर्वी जेव्हा ते मजुरी तत्त्वावर काम करत होते, तेव्हा त्यांची वार्षिक उलाढाल दोन लाख रुपयांच्या आसपास होती. मात्र गेल्या दोन वर्षांत त्यांच्या व्यवसायाची उलाढाल 19 ते 20 लाख रुपयांच्या आसपास वाढली आहे. सध्या त्यांचा व्यवसाय भाडेतत्त्वावरील जागेत आहे. मात्र, आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याने ते आता धामणी रस्त्यावर स्वतःचे वर्कशॉप सुरू करणार आहेत. एकूणच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून कर्ज मिळाल्याने पाटील कुटुंबियांच्या जीवनात मोठा बदल घडून आला आहे.
संप्रदा द. बीडकर
माहिती अधिकारी, सांगली
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा