बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

अल्पसंख्याकांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी गतीने करा - अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख

सांगली, दि. 14, (सांगली) : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला राजवाडा येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात जागा देण्याचा जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली सर्वच यंत्रणांनी अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची प्रभावीपणे आणि गतिमान पद्धतीने अंमलबजावणी करावी. यासाठी आयोग सर्वांच्या सोबत आहे, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिले. यावेळी त्यांनी ख्रिश्चन समाजासाठीच्या दफनभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा तसेच जैन समाजाचे धर्मगुरू ज्या मार्गाने जातील त्या मार्गावर त्यांना पोलीस बंदोबस्त द्यावा असे निर्देशही दिले.
    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अल्पसंख्याक समाजासाठीच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी वि. ना. काळम, आमदार शिवाजीराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मीनाज मुल्ला यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अल्पसंख्याक समाजातील विविध धर्मांच्या प्रतिनिधींशी भेटीनंतर अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हाजी अराफत शेख यांनी ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न असून, त्यांना दफनभूमिसाठी प्राधान्याने जागा देण्यासंबंधात कार्यवाही करावी, असे सांगितले. यावेळी त्यांनी जैन समाजातील धर्मगुरूही ज्या मार्गाने जात असतील, त्या मार्गावर त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, असे सांगितले.
समाजातील सर्व घटकांमध्ये सामाजिक सलोखा राखला जावा, कोणत्याही किरकोळ तंट्यांना जातीय स्वरूप दिले जाणार नाही, यासाठी पोलीस दलाने अधिक दक्ष राहावे, असे सांगून सामाजिक माध्यमांमधूनही जातीय सलोखा बिघडवणारे संदेश देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम हे अत्यंत सूक्ष्मपणे अल्पसंख्यांकांसाठीच्या विविध विषयांवर काम करतात, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करून  अध्यक्ष हाजी अराफत शेख म्हणाले, अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारशी आणि जैन या समाजांचा समावेश असून या समाजातील तरूण-तरुणींना रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्रिय व्हावे. अल्पसंख्याक समाजासाठी कौशल्य विकासाच्या दृष्टीनेही प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी अधिकचे रोजगार मेळावे घेण्याबरोबरच तरूणांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यावरही भर द्यावा.
    अल्पसंख्याक समाजातील तरूणांना विविध व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून व्यवसाय, उद्योगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मौलाना आझाद महामंडळामार्फत अन्य मोठ्या उद्योग व्यवसायासाबरोबरच रिक्षा, टॅक्सी, टेम्पो अशा छोट्या-मोठ्या उद्योगासाठीही कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी सांगितले.
    अध्यक्ष हाजी अराफत शेख म्हणाले, मदरशांचे आधुनिकीकरण करून अल्पसंख्याक मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्याच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अल्पसंख्याक युवकांची आर्थिंक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती साधून त्यांच्यात सकारात्मक बदल घडविण्याच्या कामासही प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले. अल्पसंख्याक समाजातील युवकांसाठी पोलीस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनाही प्रभावीपणे राबवावी, अशी सूचना त्यांनी केली.
आमदार शिवाजीराव नाईक यांनी यावेळी सांगली जिल्ह्यातील भौगोलिक, सामाजिक माहिती देवून मुस्लीम समाजातील मुलींना उच्च शिक्षणासाठी चांगली सोय निर्माण करण्याकरिता वसतिगृह व्हावे, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी विविध समाजाच्या दफनभूमिसाठीच्या जागांचाही प्रश्न मांडला. अल्पसंख्याक समाजातील होतकरू तरूण-तरूणींना मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी आग्रहाचे प्रतिपादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न मानवी दृष्टीकोनातून सोडवले गेले पाहिजेत, असे सांगून अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष असल्याचे सांगितले.
    याप्रसंगी महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, अग्रणी बँक, कौशल्य विकास, आयटीआय, वनविभाग, क्रीडा विभाग आदि विभागांमार्फत अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा यावेळी अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी सविस्तरपणे आढावा घेतला.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा