शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

नवमाध्यमांची गरज ओळखून काम करताना वस्तुनिष्ठता आवश्यक - माहिती उपसंचालक सतीश लळीत

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : डिजीटल युगातील नवमाध्यमांचा पसारा मोठा आहे. ऑनलाईन पत्रकारिता, त्यासाठी विविध ॲप, वेब मीडिया असे अनेक पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. या नव्या माध्यमांची गरज ओळखून काम करताना वस्तुनिष्ठता आवश्यक आहे. पण, दूरसंचार आणि संगणक क्रांतीमुळे माहितीच्या आदानप्रदानाचा वेग वाढला आहे. हे एकीकडे वरदान असले तरी, चुकीच्या बातम्या आणि माहिती पसरवणे हेही त्यामुळे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे त्यामुळे नवमाध्यमांत होणाऱ्या गफलती टाळण्यासाठी अचूकता, पडताळणी आणि पारदर्शकता या तीन गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनीति आणि आव्हाने या विषयावर मुद्रित माध्यमे, नभोवाणी, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि डिजीटल युगातील नवमाध्यमे यांचा सविस्तर उहापोह केला. आत्मा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब पुजारी, युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक नवनाथ गोरे, माहिती अधिकारी संप्रदा बीडकर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. लळीत म्हणाले, 1990 च्या दशकात झालेल्या संगणक क्रांती, दूरसंचार क्रांतीमुळे माध्यमांचा विस्तार झाला. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आता उदय झालेल्या डिजीटल मीडियाने माध्यमांच्या कामकाजात सुलभता आणली. मात्र, त्याचप्रमाणे बातमीची अचूकता, विश्वासार्हता याबाबत शंका निर्माण होऊ लागली. वेगाने प्रसार होणाऱ्या फेक न्यूज थांबवणे आव्हान होऊन बसले आहे. फेक न्यूज निर्मिती आपण थांबवू शकत नाही. पण त्याचा प्रसार थांबवू शकतो. त्यासाठी स्वतःवर आचारसंहिता घालून घेणे आणि स्वयंशिस्त ठेवणे हाच पर्याय आहे, असे ते म्हणाले.
माहिती उपसंचालक सतीश लळीत म्हणाले, बातमी सत्य, अचूक, स्वतंत्र, कोणत्याही दबावाशिवाय आणि मानवतावादी भूमिका घेऊन लिहिणे समाजप्रबोधन हा बातमीचा पाया असणे, हा एक काळ होता. मात्र, डिजीटल युगात पत्रकारिता हा एक व्यवसाय होऊन बसला आहे. त्यामुळे नॉट फॉर प्रॉफिट जर्नालिझम हे बदलत्या युगात आव्हान आहे.
श्री. लळीत म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारितेने समाजाची जशी विश्वासार्हता जोपासली आहे, त्याच पध्दतीने डिजीटल मीडियाच्या माध्यमातूनही विश्वासार्हता जोपासण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पत्रकारांनी ही माध्यमे समाजहित डोळ्यासमोर ठेवून हाताळताना सत्यता पडताळणे गरजेचे आहे. डिजीटल मीडिया समजावून घेवून चांगल्या गोष्टींना प्राधान्य देवून समाजमाध्यमांचा योग्य पध्दतीने लोक हितासाठी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माहिती उपसंचालक यांनी पारंपरिक माध्यमे, नभोवाणी, इलेक्ट्रॉनिक मीडिया, दूरसंचार क्रांती आणि संगणक क्रांती यांची टप्प्याटप्याने सखोल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील उदाहरणे देवून मांडणी केली. तसेच, फेसाटी आणि नवनाथ गोरे यांच्यामुळे सांगलीचे नाव उज्ज्वल झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांनी नवनाथ गोरे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने नवनाथ गोरे यांचा उपसंचालक सतीश लळीत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नवनाथ गोरे यांनी फेसाटीमध्ये जतसारख्या दुष्काळी तालुक्यात जीवन जगताना स्वत: अनुभवलेला संघर्ष लेखणीतून झिरपला असल्याचे सांगितले. ते म्हणाले, दुष्काळी भागात आणि गरीबीमध्ये शैक्षणिक सुविधांसाठी वातावरण निर्मिती नव्हती. त्यामुळे परिस्थितीशी झगडत आपण शिक्षण घेतले. आपण स्वतः ऊसतोड कामगार म्हणून काम केले आहे. त्यामुळे आपल्या संघर्षाला फेसाटीमधून वाचा फोडली गेली आहे. वाचकाचे सूक्ष्म निरीक्षण लेखकाला घडवते. या पुरस्कारातून आपल्याला याही पुढे जाण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे सांगून त्यांनी हा पुरस्कार सर्वसामान्यांचा आहे, अशी नम्र भावना व्यक्त केली.
नवनाथ गोरे यांचा आदर्श घेऊन पत्रकारांनी सामाजिक बांधिलकातून लेखन करण्याची प्रेरणा घ्यावी, असे स्पष्ट करून ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब पुजारी म्हणाले, पत्रकाराने जाणता लेखक होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पत्रकारिता करताना माणुसकी ठेवणं गरजेचे आहे.
प्रास्ताविकात माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष खराडे, शिवाजी कांबळे, हरिष यमगर, प्रकाश कांबळे, दिलीप पाटील, सुकुमार पाटील, मनोहर पवार, सागर बोराडे, धनंजय पाठक, रविंद्र कांबळे, कुलदीप माने, दीपक चव्हाण, संजय देसाई, राजेंद्र कांबळे, विजय पाटील, शरद जाधव, अनिल कदम, जगदीश धुळुबुळू, सरफराज सनदी, शंकर देवकुळे, ईश्वर हुलवान, गणेश पाटील, नितीन बडेकर, आफताब सनदी, अनिल आपटे, मारूती नवलाई, हेमंत पवार, स्वप्नील एरंडोलीकर, प्राचार्य सूर्यकांत होळकर, शिवाजी दुर्गाडे, बाळासाहेब शिंदे, बबन दळवी, संगीता ढवळे, अभिजीत शिंदे, संकेतराज बने, व्यंकटेश ताडे, मनिषा जयप्रकाश, तस्लीम कागवाडकर, गणेश चव्हाण, रेखा पाटील, अश्विनी शिबे, तेजस ढेरे, विजय पोतदार, सुवर्णा बेळगी, सुरेंद्र दुपटे, नेताजी खोत यांच्यासह मुद्रित माध्यमे साप्ताहिकांचे संपादक प्रतिनिधी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा