मंगळवार, २३ मे, २०२३

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मिरज येथे 1 जूनला महारोजगार मेळावा

सांगली दि. 23 (जि.मा.का.) : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन गुरूवार, दि. 1 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे, इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज साईनंदन कॉलनी, रमा उद्यानजवळ मिरज येथे करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली यांच्यामार्फत खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठ्या कंपन्यांमध्ये आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून या महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या महारोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामांकित 35 पेक्षा अधिक आस्थापनांकडून 10 वी पास / नापास, 12 वी, आयटीआय, पदविका व पदव्यूत्तर पदवी या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी 900 पेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच स्वयंरोजगार करू इच्छित उमेदवारांना शासनाच्या विविध महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून ऑनलाईन नोंदणी करावी. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेची मुळ / छायांकित कागदपत्रे व बायोडाटाच्या 3 प्रतीसह प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहून लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 0233-2990383 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. शैक्षणिक अर्हतेप्रमाणे पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे. शैक्षणिक पात्रता आवश्यक नसणारी पदे 70, आठवी पास / नापास 70, 10 वी / 12 वी 137, कोणत्याही शाखेचा पदवीधर 90, बी.एस्सी /एम.एस्सीो 30, बीकॉम / एमकॉम 41, बीसीए 5, बी.ई. 40, डी. फार्मसी/बी.फार्मसी 3, बीएचएमएस/बीएएमएस 5, डिप्लोमा इन इंजिनिअरींग 55, जीएनम/डीएनबी/एमआरए 13, आयटीआय 387 व एमबीए शैक्षणिक अर्हतेसाठी 25 पदे आहेत. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा