गुरुवार, १८ मे, २०२३

अमंली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी व्यापक तपासणी मोहीम हाती घ्या जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचना

सांगली दि. १८ (जि.मा.का.) :- गांजा, गुटखा यासह नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या अमंली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी व्यापक तपासणी मोहीम हाती घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत नार्को समन्वय केंद्र, एनकॉर्ड समितीची बैठक झाली. बैठकीस सर्व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, गांजा गुटखा याची वाहतूक व तस्करी होऊ नये यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. परराज्य व पर जिल्ह्यातून येणारी वाहने, बसेसची तपासणी करावी. एसटी महामंडळाच्या वाहक व चालक यांनीही याबाबत आवश्यक दक्षता घेणे गरजेचे आहे. पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी सांगितले, जिल्ह्यात गांजाचा पुरवठा कोणत्या मार्गावरून होतो, गांजाचे उत्पन्न कोठे घेतले जाते याची माहिती घ्यावी. शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी. अशी माहिती त्यांच्याकडे असल्यास ती पोलीस विभागास द्यावी. जिल्ह्यात नशेच्या गोळ्यांची अवैधरित्या विक्री होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांच्या संघटनेसोबत बैठक घेऊन याबाबत त्यांना सूचना केल्या आहेत असे त्यांनी सांगितले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा