सोमवार, ८ मे, २०२३

आपत्तीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील

1 जूनपासून नियंत्रण कक्ष सुरू करावेत सांगली दि. 8 (जि.मा.का.) : यंदाच्या पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी आवश्यक उपाय योजना आतापासून करुया, संभाव्य आपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची खबरदारी घेऊया, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, उपविभागीय अधिकारी संतोष भोर, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. किरण पराग, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासह सर्व तहसिलदार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यंदाच्या पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास आणि पुरामुळे पाणी पुरवठा योजना बाधित झाल्यास अशा गावामध्ये पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. आवश्यक तेथे टँकर सुरू करण्यासाठी आता पासून नियोजन करावे. आरोग्य विभागाने साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी औषध फवारणी करावी. पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवावा. पूर प्रवण गावांमध्ये आपत्कालीन हि साहित्य सुस्थितीत असल्याची खातरजमा करावी. संभाव्य आपत्ती, पूर परिस्थितीमध्ये करावयाचे कामाचे गावनिहाय आराखडे तयार करावेत. नदीकाठच्या गावांमध्ये मदत व बचाव कार्य याबाबतची प्रात्यक्षिके घेण्यात यावीत. यामध्ये स्थानिक स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्थांचा सहभाग घ्यावा. आपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या. पूर परिस्थिती उद्भवणाऱ्या गावांमध्ये तात्पुरती निवारा केंद्र कार्यान्वीत करण्यासाठी नियोजन करावे. यापूर्वी ज्या गावांमध्ये केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती अशा केंद्राची पहाणी करुन ती सुस्थितीत ठेवण्याचे नियोजन करावे. संभाव्य पूर परिस्थितीत पूरग्रस्तांना अन्य ठिकाणाहून येणाऱ्या मदतीचे सनियंत्रण करण्यासाठी अधिकारी नियुक्तीसाठी आवश्यक कार्यवाही करावी. संभाव्य पूरामुळे बाधित होणारी जनावरे यांची माहिती पशुसंवर्धन विभागाने संकलीत करावे. या जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्धतेबाबत कृषी विभागाने नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात ज्या ठिकाणी चारा पैदास केला जातो याची माहिती कृषी विभागाने तयार करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. यंदाच्या पावसाळ्यात पाऊस, पूर यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी. रस्त्यावर पडणाऱ्या झाडामुळे वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी उपाययोजना करुन यासाठी पथके तयार करावीत. पूरग्रस्त भागातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा, अशा सूचना करुन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जलसंपदा विभागाने धरणातील पाणीसाठा, विसर्ग, नद्यांची पाणी पातळी याबाबतची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. महानगरपालिकेने धोकादायक इमारतींबाबत आवश्यक कार्यवाही करावी. नाले सफाई, स्थानिक हेल्पलाईन क्रमांक, तात्पुरती निवारा केंद्रे, पूर परिस्थिती उद्भवल्यास नागरीकांचे स्थलांतर करणे याबाबत आवश्यक उपाय योजना कराव्यात. महाराष्ट्र राज्यविद्युत वितरण कंपनीने ट्रान्स्फॉर्मर खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी पथके गठीत करावीत. आपत्तीच्या काळात विद्युत पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्याची नियोजन करावे. संभाव्य पूर परिस्थितीत पोलीस विभागाने आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा. ग्रामपंचायत विभागाने नदीकाठच्या गावांना देण्यात आलेल्या बोटी व अन्य साहित्य सुस्थितीत असल्याची खातरजमा करुन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा