शुक्रवार, १२ मे, २०२३

व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करा - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे

तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती होणे गरजेचे सांगली दि. 12 (जि.मा.का.) : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे मुख कर्करोग होतो. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफुस, गळा, अन्ननलिका, मुत्राशय तसेच नाक, पोट, गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो. त्याचबरोबर इतर विविध आजार व उपचार न करता येणारा अल्सर यासारखे आजार उद्भवतात. यामुळे तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती होणे गरजेचे आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करावा. पुढील पिढी सुदृढ, व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत व सांगली जिल्हा तंबाखू मुक्त करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त 1 ते 31 मे 2023 या कालावधीत तंबाखू विरोधी जनजागृतीपर विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडविण्यासाठी उपजिल्हा रूग्णालय शिराळा, इस्लामपूर, कवठेमहांकाळ तसेच ग्रामीण रूग्णालय कडेगाव, पलूस, विटा, तासगाव, आटपाडी व जिल्हास्तरावर तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले असून तंबाखू सेवन सोडविण्यासाठी तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्राची अथवा 1800-11-2356 या Quit Line ची सहाय्यता घ्यावी. जागतिक प्रौढ तंबाखू निरीक्षण २०१६-१७ (Gats) नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण हे तरूण पिढीमध्ये वाढत चालले असून तंबाखूमुळे होणाऱ्या विविध कर्करोगांची जनजागृती करणे गरजेचे आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी व शालेय परिसरात दंडात्मक कारवाई करण्यात येते. कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी आहे. कलम ५ नुसार तंबाखू जन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, कलम ६ (अ) नुसार १८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ ‍विक्री करण्यास बंदी, कलम ६(ब) नुसार सर्व शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी व कलम ७ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टनावर केंद्र शासनाने निर्देशित केलेल्या आरोग्याबाबतीत धोक्याची सुचना छापणे (८० टक्के भाग व्यापलेला असावा). ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा