गुरुवार, १८ मे, २०२३

अटल जल व्हिडिओ, शॉर्ट फिल्म स्पर्धेत 10 जून पर्यंत नोंदणी करता येणार - वरीष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ

विजेत्यांना रोख रकमेचे पारितोषीक देऊन गौरविण्यात येणार सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेंतर्गत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाने भूजल या विषयावरील व्हिडिओ आणि लघुपट निर्मितीची स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेला अटल जल व्हिडिओ, शॉर्ट फिल्म स्पर्धा- 2023 असे नाव दिले आहे. या स्पर्धेत सहभागासाठीची नोंदणी 4 मे पासून सुरू झाली असून इच्छुकांना येत्या 10 जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. विजेत्यांना रोख रकमेचे पारितोषीक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा सांगलीचे वरीष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ यांनी केले आहे. लोकसहभागातून भूजल पातळी वाढवावी, नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, या भावनेतून भूजल बचतीवर जनजागृती करणारे व्हिडिओ आणि लघुपटांची निर्मिती केली जाणार आहे. हे जनजागृतीपर व्हिडिओ व लघुपट समाजातील घटकांनीच निर्माण करावेत, या उद्देशाने राज्याच्या भूजल व सर्वेक्षण विकास यंत्रणेने भूजल या विषयावरील व्हिडिओ आणि लघुपट निर्मितीची स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. लघुपट, व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ (रिल्स) या तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात येणार असून प्रत्येक गटातून राज्यस्तरावर पहिल्या तीन विजेत्यांची निवड किली जाणार आहे. यामधील लघुपट निर्मिती स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या गुणानुक्रमे पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 10 हजार, 7 हजार आणि 5 हजार रुपयांचे, व्हिडिओ निर्मिती गटातील विजेत्यांना अनुक्रमे 7 हजार, 5 हजार आणि 3 हजार रुपये आणि शॉर्ट व्हिडिओ (रिल्स) या गटातील विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार आणि 2 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी भूजल व्यवस्थापन, पाणी बचतीच्या पद्धती, पीक फेरबदल, लोकसहभागाचे महत्व, महिलांचा गावाच्या विकासातील सहभाग, महिलांची गटशेती, सूक्ष्म सिंचनाचे फायदे, कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची लागवड, घरगुती पाणी बचतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, परसबाग लागवड, महिला आणि पाणी, पाणी अनमोल संपत्ती, पाऊस पाणी संकलन, आदर्श गावाची संकल्पना, शोष खड्डयांचा उपयोग आणि महत्व, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन हे विषय आहेत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन कक्ष भूजल सर्वेक्षण विभागाशी 9130950307 या मोबाईल क्रमांकावर किंवा ataljalgsda@gmail. com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही वरीष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा