रविवार, २५ जून, २०१७

सामाजिक न्याय दिनानिमित्त चित्ररथ व रॅलीने शहर दुमदुमले

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जून हा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाच्यावतीने सामाजिक न्याय दिन म्हणून संपूर्ण राज्यभर साजरा केला जातो. सामाजिक न्याय दिनानिमित्त आज सांगली शहरातून सामाजिक न्यायाच्या विविध योजनांवर आधारित चित्ररथ तसेच विद्यार्थ्यांच्या रॅलीने शहर दुमदुमून गेले. विद्यार्थ्यांच्या रॅलीने सामाजिक न्याय दिन जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे साजरा करण्यात आला.
सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी एस.टी.स्टॅण्ड सांगली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तसेच व्यसनमुक्तीबाबत उपस्थितांनी शपथ घेऊन सामाजिक समता रथ विद्यार्थ्यांच्या रॅलीस प्रारंभ केला. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, माजी नगरसेवक उत्तम कांबळे, कै. सोना आलगोंडा पाटील चॅरीटेबल ट्रस्टचे डॉ. सुरेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेल्या या रॅलीची सांगता स्टेशन चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ झाली. यावेळी रॅलीत सामाजिक समता रथाबरोबर हि. हा.रा. चिं. पटवर्धन हायस्कूल, सांगली, सिटी हायस्कूल सांगली, राणी सरस्वती देवी कन्या शाळा सांगली या शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थीनीं सहभागी झाले होते. रॅलीच्या मार्गात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी रॅलीतील सहभागी विद्यार्थी-विद्यार्थींनीना खाऊचे वाटप करण्यात आले. समाज कल्याण विभाग सांगली   कै. सोना आलगोंडा पाटील चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय दिन जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त आयोजित रॅलीत विद्यार्थ्यांच्या हातात व्यसनमुक्तीचे फलक झळकत होते. यावेळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ व्यसनमुक्तीबाबत शाहीर आंबी यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले.
सामाजिक न्याय दिनाच्या या कार्यक्रमास महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोेकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती विकास महामंडळ, ओबीसी महामंडळाचे विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आष्टा आश्रमशाळेचे शिक्षक ए. के. पाटील यांनी केले.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा