शुक्रवार, ९ जून, २०१७

वृक्षलागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय योगदान द्यावे - जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : दोन कोटी वृक्ष लागवड हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्हयात 8 लाख, 84 हजार, 602 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन   जिल्हाधिकारी विजयकुमार  काळम-पाटील यांनी आज केले.
    लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित पर्यावरण सप्ताह सांगता कार्यक्रमात ते मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथे बोलत होते. निलजी बामणीसह मौजे कळंबी, दंडोबा पर्यटन स्थळ येथे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, उपवन संरक्षक भारतसिंह हाडा, मिरज तहसिलदार शरद पाटील, गट विकास अधिकारी राहुल रोकडे आदि  उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील म्हणाले, दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात दि. 1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात 8 लाख, 84 हजार 602 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 97 टक्के खड्डे खणून तयार आहेत. जिल्ह्यातील विविध 24 रोपवाटिकांमध्ये 20 लाख रोपे उपलब्ध आहेत. पर्यावरण प्रेमींच्या सोयीसाठी जिल्ह्यातील विविध 13 केंद्रांवरुन तयार रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच वृक्ष लागवडीचे महत्व विषद करण्यासाठी जाहिरात फलक, ध्वनीफीत (जिंगल्स) अन्य प्रसार माध्यमांतून प्रचार प्रसार करण्यात येणार आहे. या पाश्‍र्वभूमीवर वृक्षलागवडीच्या महत्वांकाक्षी कार्यक्रमात सांगली जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी निसर्गसंपदेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यक्रमात लोकसहभाग महत्वाचा आहे. तरी जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवाभावी संस्था, हरित सेना, निसर्ग पर्यावरण प्रेमी नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभागी होऊन वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित पर्यावरण सप्ताहाच्या सांगतेनिमित्त जिल्हाधिकारी श्री. काळम-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरज तालुक्यातील मौ. निलजी-बामणी, मौ. कळंबी व पर्यटन स्थळ दंडोबा डोंगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. मौ. निलजी-बामणी येथे एका खाजगी शेतकऱ्याच्या शेतात, मौजे कळंबी येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात आणि दंडोबा डोंगर-माथ्यावर हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच प्रधान मंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेअंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात पाच लाभार्थींच्या घरांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच जॉब कार्ड वाटप करण्यात आले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ पर्यावरण सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे शासनाकडून निर्देश होते. तसेच या सप्ताहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रम करण्याच्या आणि मजूर नोंदणी उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हा सप्ताह जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी मिरज पंचायत समिती उपसभापती काकासाहेब दामणे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी, विदयार्थी, महसूल व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी खानापूर तालुक्यातील वासुंबे व वाळवा तालुक्यात इस्लामपूर, तासगांव तालुक्यात भैरववाडी आणि मिरज तालुक्यातील नरवाड या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. 
00000

   



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा