गुरुवार, २२ जून, २०१७

जिल्हा वार्षिक योजना आराखड्यांतर्गत प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा - पालकमंत्री सुभाष देशमुख



- जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
- 2017-18 च्या एकूण 295 कोटी 31 लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी
- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश

सांगली, दि. 22 (जि. मा. का.) : सन 2016-17 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यांतर्गत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि ओटीएसपी अशा योजनांतर्गत एकूण 285 कोटी, 75 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी 272 कोटी 84 लाख रुपये निधी प्राप्त झाला. या निधीपैकी मार्चअखेर 265 कोटी कोटी 66 लाख रुपये खर्च झाले. मात्र, काही विभागांचा काही प्रमाणात निधी अखर्चित आहे. तसेच कामे प्रलंबित आहेत. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा आणि प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस कृषि फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांच्यासह समितीचे सन्माननीय सदस्य-सदस्या आणि सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सन 2016-17 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यांतर्गत सर्वसाधारण योजनेंतर्गत 212 कोटी, 20 लाख रुपये मंजूर झाले. त्यापैकी सर्व निधी प्राप्त झाला. मार्चअखेर प्राप्त निधीपैकी 208 कोटी 96 लाख रुपये निधी खर्च झाला. खर्चाची ही टक्केवारी 98.47 टक्के आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 72 कोटी 46 लाख रुपये मंजूर झाले. त्यापैकी 59 कोटी, 55 लाख रुपये प्राप्त झाले. त्यापैकी 55 कोटी, 61 लाख रुपये मार्चअखेर खर्च झाला. खर्चाची ही टक्केवारी 93.38 टक्के आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना कार्यक्रमांतर्गत 1 कोटी 9 लाख रुपये मंजूर प्राप्त झाले सर्व निधी 100 टक्के खर्च झाला आहे. मंजूर निधीतील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले.
पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी 2017-18 या आर्थिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अर्थसंकल्पित तरतुदीची माहिती यावेळी दिली. ते म्हणाले, 2017-18 मध्ये सर्वसाधारण योजनेंतर्गत 212 कोटी, 65 लाख रुपये मंजूर झाले. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 81 कोटी 51 लाख रुपये मंजूर झाले. तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना कार्यक्रमांतर्गत 1 कोटी 15 लाख रुपये असा तिन्ही योजनांसाठी एकूण 295 कोटी 31 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. हा निधी वेळेत खर्च करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासूनच योग्य नियोजन करून, चांगली, दर्जेदार आवश्यक कामे करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यात आला. या अभियानांतर्गत सन 2016-17 अंतर्गत जिल्ह्यामध्ये 140 गावे निवडण्यात आली. या गावांमध्ये एकूण 4 हजार, 32 कामांसाठी 157 कोटी, 66 लाख रुपये इतका आराखडा मंजूर आहे. एकूण 4 हजार 494 कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यापैकी 3 हजार 878 कामे सुरू केली असून, 2 हजार 826 कामे पूर्ण आहेत. 1 हजार 52 कामे प्रगतीपथावर आहेत.  जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रलंबित कामे जून महिन्याअखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
बैठकीत जिल्ह्यातील सिद्धेश्वर मठ, मालगाव (ता. मिरज), हनुमान मंदिर, माळवाडी (ता. पलूस), सिद्धेश्वर मंदिर, काराजनगी (ता. जत) या तीर्थक्षेत्रांना वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली.       
यावेळी सर्व विभागांकडील योजनांचा सविस्तरपणे आढावा घेण्यात आला. खासदार, आमदार तसेच समिती सदस्यांनी मौलिक सूचना केल्या. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी स्वागत प्रास्ताविक केले. जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांनी बैठकीची माहिती दिली. या बैठकीस माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी आमदार अजितराव घोरपडे, समिती सदस्य आणि सर्व यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
00000











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा