शुक्रवार, ३० जून, २०१७

एकच लक्ष... लावा वृक्ष...

महाराष्ट्र राज्यात सन 2017 ते 2019 या कालावधीत 50 कोटी वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र, ही केवळ सुरूवात आहे. पर्यावरणाच्या संतुलनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे वनक्षेत्र 20 टक्क्यांवरून 33 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी मोठी मजल गाठावयाची आहे. वरिष्ठ स्तरावर मांडलेल्या गणिताप्रमाणे 33 टक्के क्षेत्र वृक्ष छायेखाली आणण्यासाठी जवळपास 400 कोटी झाडे लावावी लागतील. त्यामुळे हा कार्यक्रम निरंतर सुरू राहणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 50 कोटी वृक्षलागवडीची महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेंतर्गत सन 2017 च्या पावसाळ्यामध्ये संपूर्ण राज्यात 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज आहेत. सांगली जिल्ह्यात सन 2017 च्या पावसाळ्यात सांगली जिल्ह्याच्या वनविभागासह ग्रामपंचायत इतर यंत्रणांसाठी एकूण 8 लाख 84 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
     वृक्ष लागवड करण्याबाबत नियोजन आराखडा अंमलबजावणी कार्यक्रम आखण्यात आला आहे.      हा केवळ रोपे लागवडीचा कार्यक्रम नसून लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्या दृष्टीने पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी यासंदर्भात नियोजन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार उपवनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारत सिंह हाडा विभागीय वन अधिकारी विश्वास जवळेकर यांनी अत्यंत काटेकोरपणे वृक्षारोपणाचे नियोजन केले आहे. या मोहिमेंतर्गत आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वृक्षारोपणाच्या अंमलबजावणी संनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी वि. ना. काळम आहेत. तर तालुकास्तरीय समितीचे उपविभागाीय अधिकारी इस्लामपूर, मिरज, कडेगाव, विटा जत हे अध्यक्ष आहेत. ग्रामस्तरीय समितीचे संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच हे अध्यक्ष आहेत. 1 जुलै रोजी करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीचे सांगली जिल्ह्यासाठी 8 लाख 84 हजार इतके उद्दिष्ट आहे. यामध्ये वन विभागास 4 लाख, सामाजिक वनीकरण विभागास 64 हजार, ग्रामपंचायत 2 लाख 55 हजार इतर यंत्रणांना 1 लाख 65 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीसाठी वन विभागाकडे 11 लाख 91 हजार तर सामाजिक वनीकरण विभागाकडे 9 लाख 6 हजार अशी एकूण 20 लाख 97 हजार इतकी रोपे तयार आहेत. पर्यावरण प्रेमींच्या सोयीसाठी जिल्ह्यातील विविध 3 केंद्रांवरुन तयार रोपांचे वाटप करण्यात आले आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनीही  कंबर कसली आहे. वृक्ष लागवडीच्या 1 ते 7 जुलै रोजीच्या कार्यक्रमासाठी खड्डे खुदाई खड्डे भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. सन 2017 च्या पावसाळ्यात वृक्ष लागवडीकरिता जिल्हास्तरावर 10, तालुकास्तरावर 17, गावस्तरावर 86 बैठका घेण्यात आल्या. तसेच 1 मे 2017 रोजीच्या ग्रामसभेत 733 ठिकाणी बैठका घेण्यात आल्या आहेत. वृक्ष लागवडीसाठी वन विभागाच्या संकेत स्थळावर 1 लाख 24 हजार 531 इतक्या सांगली जिल्हा हरित सेना सदस्यांची नोंदणी झाली आहे. लागवड झालेल्या रोपांची नोंदणी, संरक्षण देखभाल यासाठी नियोजन करण्यात आले आहे. ज्या व्यक्ती, यंत्रणा यांनी रोप लागवडीची अद्यापही ऑनलाईन नोंद केली नाही, त्या करीता वन विभागाच्या www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर My Plant App हे मोबाईल ऍ़प देण्यात आले आहे. त्यामधून रोपलागवडीची माहिती ऑनलाईन भरू शकतो.
यशस्वी वृक्षलागवडीसाठी लागवडीच्या सात सुत्रांचा अवलंब करण्याचे आवाहन वनविभाग सांगलीचे उपवनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारत सिंह हाडा सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी विश्वास जवळेकर यांनी केले आहे. यामध्ये (1) किमान 0.45 x 0.45 x 0.45 मीटरचा खड्डा खोदून माती बाजूला करा, (2) दोन रोपे / खड्‌ड्यामधील अंतर 2 ते 3 मीटर ठेवा, (3) खड्डा, चांगली माती, कंपोस्ट खते, कीटकनाशके वापरून पूर्ण भरावा, (4) हळद, हिंग, कापूर (2:1:1 प्रमाणात) घातलेल्या पाण्यामध्ये, रोपांची पिशवी पूर्णपणे चांगली भिजवा. यामुळे दुष्काळी स्थितीतही साधारणपणे महिनाभर रोपे तग धरून जिवंत राहतील, (5) टिकावाने पिशवीच्या उंचीच्या मापाचे डवचे घेवून, ब्लेडने पिशवी कापून मातीच्या गठ्‌ठ्यासह रोपे डवच्यामध्ये ठेवा, (6) रोपे लावून रोपांच्या कॉलर पर्यंत मातीने खड्डा पूर्ण भरून घेवून रोपासभोवतालची माती हळूवार दाबा, (7) रोपांच्या काटेरी संरक्षक कुंपण (1.5 - 2 मीटर उंचीचे) करा. शक्य झाल्यास रोपांच्या मुळाशी पाण्याने भरलेले छोटे मडके / प्लॅस्टिक बाटली (बिसलेरी टाईप), त्यामधील पाणी  झिरपेल अशा रीतीने ठेवा, अशी वृक्षलागवडीचे सात सुत्र आहेत.
वृक्ष लागवडीचे महत्त्व विषद करण्यासाठी जाहिरात फलक, ध्वनीफीत (जिंगल्स) अन्य माध्यमांतून प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. शासकीय यंत्रणांबरोबरच जिल्ह्यातील सर्व निसर्ग प्रेमी, स्वयंसेवी संस्था, प्राणी मित्र संघटना, आध्यात्मिक संस्थांनी दिनांक 1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत आपल्या नजीकच्या रोपवन स्थळावर जाऊन वृक्ष लागवड करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, रोप आपल्या दारी हा उपक्रमही वनविभागाने राबवला आहे. आपल्या जवळ असणाऱ्या रोप लागवडींच्या स्थळांची माहिती वन विभागाच्या जिल्हा तालुका स्तरावरील कार्यालयात उपलब्ध आहे. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावावा.
   वृक्षारोपणाच्या या सामाजिक कार्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, प्राणीमित्र संघटना, निसर्ग प्रेमी, शासकीय, निमशासकीय संस्था, विविध शाळा, विद्यालये यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा वसुंधरेला हरित करण्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलावा. तर चला पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वजण एकत्र येवून 1 जुलै रोजीचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच निरंतर वृक्षारोपणासाठी सक्रिय होवूया...
-         संप्रदा बीडकर
-         प्र.जिल्हा माहिती अधिकारी
-         सांगली
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा