सोमवार, १८ जून, २०१८

राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा सज्ज - जिल्हाधिकारी वि. ना. काळम

- सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

   सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्हा सज्ज असून, वृक्षलागवडीसाठी आवश्यक खड्डे खुदाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आवश्यक रोपेही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच, 1 ते 31 जुलै या महिनाभराच्या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाचा आराखडा तयार केला आहे. ही माहिती जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे दिली.
वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यांसदर्भातील पूर्वतयारीचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, उपवनसंरक्षक (प्रा) भारतसिंह हाडा, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विश्वास जवळेकर, सहाय्यक वनसंरक्षक सागर गवते यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, 13 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यासाठी 29 लाख 17 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी 98 टक्के खड्डे खुदाई पूर्ण झाली आहे. तर 45 लाख 45 हजार रोपे उपलब्ध आहेत. यापैकी 29 लाख 17 हजार रोपांची या वर्षी लागवड करण्यात येणार आहेत. उर्वरित रोपे पुढील वर्षीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी वापरण्यात येणार आहेत. याकरिता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्याकरिता www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र हरित सेना नोंदणी करण्यात येत आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातून 1 लाख 57 हजारहून अधिक सदस्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
वृक्षारोपणाच्या या सामाजिक कार्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, प्राणीमित्र संघटना, निसर्ग प्रेमी, शासकीय, निमशासकीय संस्था, विविध शाळा, विद्यालये यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी यावेळी केले.  
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या तयारीचा आढावा सादर केला.                                                                                 
   उपवनसंरक्षक (प्रा) भारत सिंह हाडा म्हणाले, सन 2018 च्या पावसाळ्यात सांगली जिल्ह्यात वन विभागासाठी 11 लाख 50 हजार, सामाजिक वनीकरण विभागासाठी 5 लाख, ग्रामपंचायतींसाठी 7 लाख 63 हजार इतर यंत्रणांसाठी 5 लाख 4 हजार असे एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता वन विभागासह, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत इतर यंत्रणा यांच्याकडून नियोजन चालू असून दिनांक 1 ते 31 जुलै 2018 या कालावधीत रोप लागवड निश्चित पूर्ण होईल.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा