रविवार, ३ जून, २०१८

बँकांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ गरजूंना द्यावा - पालकमंत्री सुभाष देशमुख

- जिल्हा मुद्रा समन्वय समितीची बैठक संपन्न

सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : सामान्य नागरिकांना इच्छा असूनही आर्थिक सहाय्याअभावी अनेकदा व्यवसाय, उद्योग सुरू करता येत नाहीत. त्यामुळे अशांच्या मदतीसाठी शासनाने मुद्रा योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. या योजनेचा लाभ गरजू, वंचित आणि तळागाळातील जनता तसेच, नवउद्योजकांना द्यावा, असे निर्देश सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा मुद्रा समन्वय समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांच्यासह समितीचे सन्माननीय सदस्य-सदस्या आणि सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
बँकांच्या उदासीनतेमुळे अनेक इच्छुक तरूण प्रधानमंत्री मुद्रा योजनाच्या लाभापासून वंचित राहात आहेत. त्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि मुद्रा बँक योजनेतून कमाल 10 लाख रुपये मर्यादेत कर्ज दिले जाते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 10 लाख रुपयांच्या कर्जावरील व्याज माफ केले जाते. त्यामुळे या दोन्ही योजनांची सांगड घालून सांगली जिल्ह्यात अधिकाधिक नवउद्योजक घडावेत, यासाठी बँकांनी मनापासून प्रयत्न करावेत. आतापर्यंत कर्ज दिलेल्या नवीन लाभार्थींची यादी बँकेच्या शाखानिहाय दर्शनी भागात प्रदर्शित करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरू, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते, असे स्पष्ट करून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, आपल्या सांगली जिल्ह्यात उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे अनेक तरूण आहेत. मात्र, त्यांना कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान उद्योग, व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. भांडवलाची उपलब्धता, कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा यांचा विचार करून तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने मुद्रा बँक योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अशा तरूणांना मुद्रा योजनेतून कर्ज देऊन बँकांनी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचाही घेतला आढावा
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत एकरकमी परतफेडी (ओटीएस) योजनेतील लाभार्थ्यांसाठी 30 जून 2018 अंतिम मुदत आहे. तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची रक्कम भरून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच याकामी बँकानीही स्वत:हून पुढाकार घेवून अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी योजनेचा लाभ द्यावा, असे ते म्हणाले.
   यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी या योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा मांडला.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा