शुक्रवार, १५ जून, २०१८

खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी दक्षता घ्या - कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत

अप्रमाणित बियाणे, खते, कीटकनाशके विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

    सांगली दि. 15 (जि. मा. का.) : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे बी-बियाणे, खते यांचा पुरेसा साठा यंत्रणांनी उपलब्ध करून द्यावा. खते, बियाणे, निविष्ठा यामधील शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणांनी दक्ष राहून परवानगी नसलेल्या अप्रमाणित बियाणे, खते, कीटकनाशके विकणाऱ्यांकडील संपूर्ण साठा जप्त करून कठोर कारवाई करावी. त्यांच्यावर गुन्हे  दाखल करावेत, असे निर्देश कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिले.
    कृषि फलोत्पादन, पणन, पेरणी हंगाम आदिंबाबत आढावा घेण्यासाठी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, आमदार विलासराव जगताप, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, अग्रणी बँकेचे लक्ष्मीकांत कट्टी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
    सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खरीपाचे क्षेत्र असून चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना लागणारा आवश्यक बी - बियाणे, खते, कीटकनाशके यांचा साठा यंत्रणांनी उपलब्ध करून द्यावा, असे सांगून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी तपासणी पथकांनी सातत्याने खते, बियाणांच्या नमुन्यांची तपासणी करावी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी दक्षता घ्यावी. शासनाने परवानगी दिलेल्या निविष्ठांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश दिले.
    यावेळी त्यांनी पेरणी हंगामात लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्याशी संवाद साधावा. ते वापरत असलेले बियाणे, खते, पडणारा पाऊस यांची माहिती घेवून त्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या हंगामात प्रत्येक तालुक्यात पेरणीसाठी आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. कृषि यांत्रिकीकरणासाठी गतवर्षी जिल्ह्याला 16 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला होता. या तुलनेत यावर्षी दीडपट निधी अधिक उपलब्ध करून दिला जाईल. त्या दृष्टीने कामांना पूर्वसंमती द्यावी, अशा सूचना दिल्या. जत, तासगाव, आटपाडी, खानापूर या भागात मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड उपक्रम राबविण्यात येणार असून, त्या दृष्टीने यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी स्वतंत्र काऊंटर सुरू करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
    शेतकऱ्यांनी मृद आरोग्य अभियानामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन आपल्या शेतीतील मातीचे आरोग्य समजून घ्यावे त्यानुसार पेरणीचे नियोजन करावे, असे सांगून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मृद आरोग्य अभियानाबाबत कृषि विभागाने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणीवजागृती करावी, अशा सूचना दिल्या.
    गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत सन 2016-17 मध्ये प्राप्त 135 प्रस्तावांपैकी 59 प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून 6 प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. तर 70 प्रस्ताव प्रलंबित आहेत. सन 2017-18 मधील 30 प्रस्तांवावर अद्यापही कार्यवाही झाली नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावर कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सदर प्रकरणांवर पाठपुरावा करण्यात येईल असे सांगून जिल्ह्यात द्राक्ष पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची मागणी असून त्याबाबतचे प्रस्ताव तात्काळ द्यावेत, असे सूचित केले.
    राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत 8 हजार 326 लोकांना 18 कोटी 67 लाख रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले असून उर्वरित 4 हजार 600 प्रस्तावांसाठीही 15 दिवसात अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दिनांक 20 जून 2018 पूर्वी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 13 कोटी वृक्षलागवड उपक्रमांतर्गत जिल्ह्यात कृषि विभागाला 2 लाख 40 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट आहे. याच्या पूर्तीमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्यावा, असे सांगून सदाभाऊ खोत यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृध्द जनकल्याण योजना, विविध विस्तार योजना, राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना, राष्ट्रीय फलोत्पादन विकास, कृषि विभागातील जिल्ह्यातील विविध रिक्त पदे आदि विषयांचा सविस्तर आढावा घेतला.
    पीक कर्ज वितरणाच्या जिल्ह्यातील उद्दिष्टाची माहिती देताना जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, पीक कर्ज वितरणामध्ये जिल्ह्याला सुमारे 2100 कोटींचे उद्दिष्ट असून आजपर्यंत 34 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ज्या बँकांनी पीक कर्ज वितरणामध्ये समाधानकारक कामगिरी केली नाही, त्यांची बैठक घेवून 24 जूनपर्यंत उद्दिष्ट पूर्तीचे निर्देश दिले आहेत. पीक कर्ज वितरणामध्ये सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावरअसून उद्दिष्ट पूर्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. ज्या बँका पीक कर्ज वितरणात आवश्यक सहभाग देणार नाहीत, त्यांच्याबाबत एसएलबीसी, आरबीआय यांना कळविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    यावेळी स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर पांडु मास्तर स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त निवड झालेल्या वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथे समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मातोश्री सरोजिनी देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
00000
-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा