मंगळवार, १२ जून, २०१८

विसरूनी जाऊ सर्व धर्म, प्रांत, जाती रक्तदान करूया मानवतेसाठी

सर्व मानवाच्या रक्तास जात, धर्म, प्रांत नसतो. सर्व रक्ताचा रंग लाल असतो. एकच धर्म असतो तो फक्त मानवता धर्म. "ये सच है कोई कहानी नही, ये सच है कोई कहानी नही, खुन खुन होता है पानी नही"  हे गाणे गुणगुणताना आठवण होते ती 1977 साली प्रर्दशित झालेल्या प्रसिध्द हिंदी चित्रपटाची, ज्याचे नाव आहे अमर अकबर ऍ़ंथनी. तीन भाऊ ज्यांची जडण घडण वेगवेगळ्या तीन धर्मामध्ये झाली शेवटी आईला रक्त देण्याची वेळ येते, त्यावेळी तीघेही रक्त देण्यासाठी पुढे येतात. त्या रक्ताचा रंग एकच आहे. तो म्हणजे लाल...
    'फादर ऑफ ट्रन्सफ्युजन मेडीसीन' या नावाने ओळखले जाणारे प्रसिध्द शास्त्रज्ञ ज्यांनी ए. बी. ओ. ही रक्तगट संकल्पना अंमलात आणली असे कार्ल लॅन्डस्टिनर यांचा जन्म दिवस 14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना यांनी 14 जून 2018 हा जागतिक रक्तदाता दिवस Give Blood Share Life या घोषवाक्याने जगभर साजरा करावा असे जाहीर केले आहे.
    रक्त रक्तघटकांचे संक्रमण हजारो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगी आहे. रक्त संक्रमण हे गरजू रूग्णांना चांगले आयुष्य जगण्यासाठी मदत करते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, बाळंतपणे गरोदर मातांमध्ये देखील काहीवेळा रक्त रक्तघटकाचे संक्रमण करणे गरजेचे असते. पण बऱ्याचदा या सर्व गरजू रूग्णांना रक्त संक्रमणापासून वंचित राहावे लागते. कारण रक्त साठ्याची कमतरता. रक्तपेढ्यांमध्ये ए, बी, ओ, एबी या रक्त गटांचे रक्त साठवून ठेवले जाते गरजू रूग्णांना मागणी प्रमाणे दिले जाते. पण या रक्तसाठवणुकीसाठी कोणीच रक्तदाता पुढे आला नाही तर .. ??? मानवी रक्ताला पर्याय नसून ते कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. त्यासाठी ऐच्छिक रक्तदान हा एकमेव पर्याय आहे.
    त्यामुळे जागतिक रक्तदाता दिनी त्या सर्व रक्तदात्यांचे शत:शा आभार जे ऐच्छिक रकतदान करण्याकरिता पुढे येतात हजारो गरजू रूग्णांचे प्राण वाचवतात. कमीत कमी 50 किलो वजन असलेली 18 ते 60 या वयोगटातील व्यक्ती जिचा रक्त टक्का (हिमोग्लोबीन) 12.5 ग्रॅम इतका आहे, अशी कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदानाचे फायदे - नविन रक्तपेशी तयार होण्यासाठी चालना मिळते, शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, कर्करोग होण्याची शक्यता कमी करते, वजन कमी करण्यासाठी मदत करते मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत होते.
    राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई यांच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 14 जून 2018 ते 30 जून 2018 हा रक्तदाता पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्त विविध स्पर्धा, रक्तदान शिबीरे, प्रभातफेरी यांचे नियोजन केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या वैद्यकीय महाविद्यालयाशी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय, सांगली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय, मिरज अशी दोन रूग्णालये संलग्न आहेत. ही रूग्णालये पश्चिम महाराष्ट उत्तर कर्नाटकातील गरीब रूग्णांसाठी आधारस्तंभ आहेत. येथे दररोज 2 हजार ते 2 हजार 200 बाह्यरूग्ण 800 ते 1 हजार आंतररूग्णांची संख्या असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात रूग्णांची संख्या असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रूग्णांना चढवल्या जाणाऱ्या रक्ताची गरज देखील जास्त आहे. त्यासाठी रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय संक्रमण औषधवैद्यकशास्त्र विभाग (Immunohematology And Blood Transfusion Department) चालू झाला आहे. त्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय, रक्तपेढी, मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय, सांगली या दोन रक्तपेढ्या कार्यान्वित असून दररोज रूग्णांच्या गरजेनुसार 50-60 पिशवी इतका रक्त रक्तघटकांचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये थॅलॅसिमिया, सिकलसेल ऍ़निमिया, अप्लास्टिक ऍ़नेमिया या सारख्या गुणसुत्रांच्या दोषामुळे होणाऱ्या रक्तविकारांवर मोफत उपचार देखील केले जातात. भविष्यामध्ये या विभागांतर्गत प्लेटलेट फेरेसेस, प्लाझमा फरेसेस, तसेच बोन मॅरो ट्रन्सप्लाट या सुविधा गरजू रूग्णांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
    तरी सर्व सामाजिक, राजकीय, औद्योगिक, शैक्षणिक संस्था, कॉलेज, महाविद्यालये यांनी रक्तदान चळवळीमध्ये सहभागी व्हावे रक्तदान करून गरजू लोकांचे प्राण वाचवावेत.

                      डॉ. अमृता अ. खाडे-भोसले
                      सहाय्यक प्राध्यापक
                      संक्रमण औषधवैद्यकशास्त्र विभाग
                      शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा