गुरुवार, २८ जून, २०१८

मंगरूळचे चेक डॅम तुडुंब

सांगली, दि. 28 (जि. मा. का.) - जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे पाणी अडवणे मुरवणे आणि या माध्यमातून टंचाईग्रस्त परिस्थितीवर मात करणे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियान साकारले जात आहे. आज या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील हजारो गावातील दुष्काळ हटण्यास मदत झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ (चिंचणी) येथे स्थानिक नाल्यावर बांधलेले चेक डॅम याचीच साक्ष देते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मृद जलसंधारण विभागामार्फत या चेक डॅमचे काम मार्च 2018 मध्ये पूर्ण करण्यात आले. या कामाला टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची साथ मिळाली. परिणामी हा बंधारा तुडुंब भरून वाहू लागला आहे.
लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सी. एच. पाटोळे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आमदार अनिल बाबर यांच्या पुढाकाराने टेंभू योजनेच्या चालू पाणी आवर्तनातून सदर चेक डॅम पूर्ण क्षमतेने भरण्यात आले आहे. बंधाऱ्याच्या मागील बाजूस जवळपास 900 मीटर पर्यंत पाणी नाल्यांमध्ये पसरलेले आहे. या चेक डॅममध्ये 56 सघमीइतका पाणीसाठा झाला आहे. याद्वारे खानापूर तालुक्यातील मंगरूळ चिंचणी गावांच्या एकूण 56 हेक्टर क्षेत्रास अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आसपासच्या विहिरी, कूपनलिका इत्यादिंच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.
कार्यकारी अभियंता सी. एच. पाटोळे म्हणाले, हा सिमेंट नाला बंधारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा यांचे मिश्रण असलेला बंधारा आहे. बंधाऱ्याची लांबी 40 मीटर तर उंची 3 मीटर आहे. या कामावर 38.74 लाख रुपये खर्च झाला आहे. या चेक डॅममध्ये दरवाजांची संख्या कमी आहे. ठराविक उंचीनंतर (खालील बाजूच्या सिमेंट नालाबांधच्या वर) दरवाजे ठेवण्यात आले आहेत.
कार्यकारी अभियंता सी. एच. पाटोळे म्हणाले, या बंधाऱ्यामुळे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामधील दरवाजे काढणे परत बसवणे हे काम जवळपास 80 टक्के वाचते. दरवाजे गंजण्याचा प्रश्न येत नाही. देखभाल दुरूस्ती कमी होते. तसेच सिमेंट नालाबांधमुळे आश्वासित पाणीसाठा होतो. त्यामुळे यामध्ये साठलेल्या पाण्याचा पुरेपुर उपयोग ग्रामस्थांना होणार आहे. दरवाज्यामधून गळतीचा प्रश्न उद्भवत नाही. काही वेळा पावसाळा संपता संपता दरवाजे बसवण्यास वेळ होतो पावसाळा संपण्यापूर्वी आवश्यक पाणी साठा होत नाही. असा प्रकार या बंधाऱ्यामध्ये दरवाजे कमी असल्यामुळे ठराविक उंचीपर्यंत सिमेंट नाला बांध असल्यामुळे होत नाही. दरवाजे बसवताना पुराचे पाणी शेतात पसरू नये, याची दक्षता घेण्यात आली आहे.
पाण्याने तुडुंब भरलेला बंधारा पाहून ग्रामस्थ आनंदित झाले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा