शुक्रवार, २२ जून, २०१८

प्लास्टीकबंदीची कडक अंमलबजावणी करा - अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण

जिल्हा पर्यावरण समितीची बैठक संपन्न

सांगली, दि. 22 (जि. मा. का.) : संपूर्ण राज्यभर दि. 23 जूनपासून प्लास्टीक थर्माकोलच्या वापरावर संपूर्ण बंदी करण्यात आली आहे. या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी आज येथे दिल्या.
जिल्हा पर्यावरण समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, सुधीर शहा, आष्टा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत निकम, कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता भा. सु. बिराजे, नगरप्रशासन विभागाचे पी. एस. हेर्लेकर, आरोग्य विभागाचे डॉ. संतोष पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एल. एस. भड आदिंसह समितीचे सदस्य उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र शासनाने प्लास्टीक थर्माकोल इत्यादिपासून बनवलेल्या अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक यासाठी बंदी घालण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे संबंधित यंत्रणांनी या नियमाची जास्तीत जास्त कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण म्हणाले, सांगली जिल्ह्यातील महानगरपालिका आणि सर्वच नगरपालिका, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीतून निर्माण होणारे सांडपाणी एकत्रित करून त्याची योग्य ती प्रक्रिया विल्हेवाट लावावी. जवळच्या नदी नाल्यामध्ये सांडपाणी मिसळणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया केलेले किंवा विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीमध्ये सोडता येणार नाही. त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सूचित केले.  
कृष्णा नदीत मृत मासे आढळल्याच्या पार्श्वभूमिवर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने नदीचे प्रदूषण थांबावे आणि सांगलीकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी सूचना गत बैठकीत करण्यात आली होती. त्यावर केलेल्या कार्यवाहीचा आढावा यावेळी घेण्यात आला.
यावेळी महानगरपालिकेचे डॉ. सुनील आंबोळे आणि सुधीर शहा यांनी याबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सुधीर शहा म्हणाले, गत बैठकीतील सूचनेप्रमाणे अस्तित्त्वातील कवलापूर पंपिंग स्टेशनवरील 300 अश्वशक्तीच्या पंपांची दुरूस्ती आणि योजना अखंडितपणे कार्यवाहीत राहण्याच्या दृष्टीने उर्वरित 300 अश्वशक्तीचे 5 पंप बसवण्याबाबत महानगरपालिकेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यांच्याकडून निविदा प्रक्रिया सुरू आहे. सांगली महानगरपालिकेकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येऊन कृष्णा नदीचे प्रदूषण रोखणे नागरिकांना शुद्ध पेयजलासाठी पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही पार पाडण्यात येत आहे.
यावेळी शेरीनाले इतर नाल्यांचे पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याने महानगरपालिकेने केलेली कार्यवाही, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचा आढावा, नगरपालिका, नगरपरिषदा महानगरपालिका यांनी एम. एस. डब्ल्यु  संदर्भात एम. एस. डब्ल्यु नियम 2016 आणि राष्ट्रीय हरित लवाद यांच्या निर्देशानुसार केलेली कार्यवाही आदिंबाबत चर्चा करण्यात आली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा