मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींमध्ये गुरूवारी उद्घाटन

- प्रधानमंत्री ऑनलाईन पद्धतीने करणार उद्घाटन - जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नियोजनाचा आढावा सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : ग्रामीण भागातील युवकांसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्‌घाटन येत्या 19 ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होत आहे. सांगली जिल्ह्यामधील केंद्रांमध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्वच यंत्रणांनी सज्ज होऊन काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे दिल्या. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पूर्वनियोजन आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व प्रशिक्षण केंद्रांचे संचालक आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, तसेच ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्रातील 511 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ, कासेगाव व वाळवा, मिरज तालुक्यातील मालगाव व कांचनपूर, शिराळा तालुक्यातील मांगले, कडेगाव तालुक्यातील वांगी, कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, खानापूर तालुक्यातील भाळवणी, तासगाव तालुक्यातील सावळज व मणेराजुरी, जत तालुक्यातील उमदी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ज्या- ज्या गावात हे केंद्र सुरु होणार आहे, त्याच्या आजुबाजूच्या गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध घटकांना यामध्ये सहभागी करून घ्यावे. या केंद्रांची माहिती या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. अधिकाधिक व्यक्तिंपर्यंत कौशल्य विकास केंद्रांची व त्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती विविध माध्यमातून पोहोचवावी. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी होईल. प्रत्येक सेंटरसाठी अनुभवी कार्यक्रम प्रमुख नियुक्त करावा. कार्यक्रमासाठी मंडप किंवा सभागृह व्यवस्था, बैठक व्यवस्था, दृकश्राव्य व्यवस्था, इंटरनेटची सुविधा, स्क्रीनची उभारणी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आदि व्यवस्था कराव्यात. तसेच वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठीची व्यवस्था करावी, असे त्यांनी सूचित केले. कार्यक्रमासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये जागा निश्चित करणे, प्रशिक्षण केंद्र असलेल्या स्थळावर प्रक्षेपणासाठी ऑडिओ व्हिज्युअल साधनांची उपलब्धता करणे, मूलभूत सोयी सुविधांची व्यवस्था करणे आदिंबाबत यावेळी डॉ. दयानिधी यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा