शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

आरोग्य व वन विभागाच्या कामकाजाचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी घेतला आढावा

सांगली दि. १४ (जि.मा.का.) :- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आरोग्य व वन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, उप वनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक उप वनसंरक्षक अजित साजने, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, कार्यकारी अभियंता क्रंतिकुमार मिरजकर आदि उपस्थित होते. आरोग्य विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात आहे. रुग्णालयात पुरेसा औषध साठा असावा याची दक्षता घेण्याची सूचना करून डॉ. खाडे यांनी सांगितले आवश्यक औषधांची मागणी वेळीच करावी. त्यामुळे औषध खरेदीत विलंब होणार नाही. रुग्णालयात आवश्यक यंत्र सामग्री सुस्थितीत असावी. नवीन यंत्र सामग्री खरेदीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या बाबतचे प्रस्ताव तयार करून सादर करावेत याचा शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले. वन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, दंडोबा डोंगर व परिसर विकासासाठी करण्यात येणारी कामे सुरू करण्याचे नियोजन करावे. वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या कामांबाबत आवश्यक तयारी करावी. पार्किंग, पिण्याचे पाणी, रस्ते या बाबींना प्राधान्य द्यावे, असे सांगितले. ००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा