मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात दि. १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नवरात्रोत्सव २०२३ हा सण साजरा केला जात आहे. हा सण-उत्सव, दि. २४ रोजीचा धम्म चक्र प्रवर्तन दिन तसेच विविध संघटनांकडून होणारी आंदोलने या सर्व पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता,पोलीस अधीक्षक,डॉ.. बसवराज तेली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अधिकार विनियमन केले आहेत. याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला असून, तो दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजीचे १८.०० वाजल्यापासून लागू झाला असून तो दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजीचे २३.५९ वाजेपर्यत अंमलात राहील. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत. रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रीतीने चालावे व त्यांची वर्तणूक कशी असावी या विषयी निर्देश देणे. अशा मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळात काढू नयेत असे मार्ग, अशा वेळा विहीत करणे. सर्व मिरवणुकींच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेच्या आसपास, उपासनेच्यावेळी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यांमध्ये, घाटात, किंवा घाटावर किंवा सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये जत्रा, देवळे, आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत, किंवा सार्वजनिक जागेजवळ वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, याबाबतचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या अधीन असलेले व त्यास पुष्ठी देणारे योग्य ते आदेश काढायचे आहेत. हा आदेश दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजीचे १८.०० वाजल्यापासून लागू झाला असून तो दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजीचे २३.५९ वाजेपर्यत अंमलात राहील. या दरम्यान पोलीस ठाणे स्थलसीमा हद्दीत कोणालाही मोर्चे, मिरवणुका, निदर्शने, सभा इत्यादी आयोजित करावयाचे असल्यास त्यांनी संबंधित पोलीस ठाणे अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून वेळ,,मार्ग,,घोषणा, सभेचे ठिकाण, जनसमुदाय इत्यादी बाबी ठरवून घेवून परवानगी घेतली पाहिजे. या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १३४ प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा