शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

दिव्यांगांना स्वयंचलित तीनचाकी सायकल पुरविण्यासाठी लाभार्थींची माहिती संकलित करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : जिल्हा दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत दिव्यांगांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेतून पात्र दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल पुरविण्यासाठी लाभार्थींची माहिती संकलित करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या. दिव्यांग कल्याण निधी नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत व समिती सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, जिल्हा परिषदेच्या ५ टक्के स्वीय निधीमधून जिल्हा दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत जवळपास सव्वा तीन कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेमधून स्वयंचलित तीन सायकल योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान ८० टक्के दिव्यांगत्व आवश्यक आहे. या अनुषंगाने यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि समाजकल्याण विभागाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लाभार्थींची यादी संकलित करावी. दिव्यांग व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. विटा, इस्लामपूर आणि कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगासाठी प्रमाणपत्र देण्याबाबत तपासणीची सोय करण्याबाबत डॉ. खाडे यांनी या बैठकीत सूचिते केले. अर्जदाराचे सर्व बाबींपासूनचे उत्पन्न एक लाखाच्या आत असावे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या पात्र अर्जदारांना लाभ देण्यात येणार आहे. बैठकीत दिव्यांग घरकुल योजनेबाबतही चर्चा करण्यात आली. दिव्यांग घरकुल योजनेंतर्गत ग्रामीण भागातील प्रति लाभार्थी एक लाख 20 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी किमान 40 टक्के दिव्यांगत्व आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या 5 टक्के स्वीय निधीमधून तरतूद करण्यात आली आहे. यामधून दिव्यांग घरकुल योजना, दिव्यांगांच्या उन्नतीसाठी शिबिर व मेळाव्याचे आयोजन यासह वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजना राबवण्यात येणार आहेत. यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा