शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

म्हैसीचा आठवडी बाजार, गुरांच्या वाहतुकासाठी अटी-शर्ती

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : जिल्ह्यामध्ये एकाही म्हैसवर्गीय पशुधनास लम्पी चर्मरोगाची लागण झाली नसल्याचे निदर्शनास आल्याबाबत जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त झालेल्या अभिप्रायाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार व राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. 18 ऑगस्ट 2023 रोजीच्या निर्बंध आदेशामध्ये सुधारणा करून जिल्ह्यांतर्गत म्हशींचे आठवडी बाजार भरविण्यास व जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक करण्यास अटी व शर्तीस अधीन राहून आदेश निर्गमित केले आहेत. जनावरांमधील लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी दि. 18 ऑगस्ट 2023 च्या आदेशान्वये संपूर्ण सांगली जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोगासाठी 'नियंत्रण क्षेत्र' घोषित करण्यात आलेले होते. नियंत्रित क्षेत्रातील बाजारपेठ, जत्रेत प्रदर्शनात किंवा प्राण्याच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती उक्त बाधित झालेल्या गुरांना व म्हशीना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यासाठी मनाई करण्यात आली होती. आता या आदेशामध्ये सुधारणा करून जिल्ह्यांतर्गत म्हशींचे आठवडी बाजार भरविण्यास व जिल्ह्यातंर्गत गुरांची वाहतूक करण्यास पुढील अटी व शर्तीस अधिन राहून आदेश निर्गमित केले आहेत. आदेशात म्हटले आहे, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यांतर्गत वाहतूक करावयाच्या गुरांचे लम्पी चर्म रोगाकरिता २८ दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. वाहतूक करावयाच्या गुरांची / म्हशींची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग नंबर असणे तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. गुरांची / म्हशींची वाहतूक करताना विहित प्रपत्रामधील आरोग्य दाखला तसेच स्वास्थ प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. म्हशींचे आठवडी बाजार भरण्यापूर्वी व नंतर संपूर्ण परिसरात जंतुनाशक व कीटकनाशक औषधाची फवारणी आयोजकांनी करणे बंधनकारक आहे. आठवडी बाजार परिसरात फक्त कानात टॅग मारलेल्या म्हैस वर्गातील जनावरांना प्रवेश देणे बंधनकारक आहे व सदर जनावराची यादी संबंधित पशुपालकांच्या नावासहीत (टॅग नंबरसह) पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती संबंधित यांना त्याच दिवशी देणे बंधकारक आहे. संक्रमित असलेल्या / संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची / म्हशींची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाच्या / जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट-अ पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलिस अधिक्षक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे करावी, असे आदेशात म्हटले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा