मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

सेंद्रिय शेती योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढवावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 31 (जि. मा. का.) :- जिल्ह्यात सेंद्रिय शेती योजना राबवण्यासाठी मोठा वाव असून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना विषमुक्त अन्न मिळणार आहे. सेंद्रिय शेती मिशनमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी बोलत होते. कार्यशाळेस कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक जांबुवंत घोडके, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, प्रकल्प उपसंचालक राजाराम खरात यांच्यासह तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, नैसर्गिक / सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शासन विविध उपक्रम व योजना राबवत आहे. शासनाची ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. विषमुक्त अन्नासाठी या योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्यावे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, सेंद्रिय शेतीतून उत्पादित झालेल्या मालाच्या प्रमाणीकरणासाठी अद्ययावत अशा प्रयोगशाळेची आवश्यकता आहे. जिल्ह्यात अशी प्रयोगशाळा होण्यासाठी व सेंद्रिय शेतीचे मार्केटिंग करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. भविष्यात सेंद्रिय उत्पादनांना मागणी वाढणार आहे. यासाठी बाजाराची मागणी पाहता उत्पदित कृषी माल त्वरित विकला जावा यासाठी ऑनलाईन मार्केटिंग बाबतही कृषी विभागाने नियोजन करणे काळाची गरज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, कृषी विभागाने आयोजित केलेली ही कार्यशाळा सेंद्रिय शेतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. कार्यशाळेत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाची पुस्तिका करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. श्री. बिराजदार म्हणाले, नैसर्गिक / सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. नैसर्गिक शेतीचे महत्व, विष मुक्त शेती याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून सेंद्रिय शेती करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे गट तयार करावेत. रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने शेतीचे आरोग्य धोक्यात आले आहे. जमिनीत जैविक गुणधर्म कमी झाल्याने जिवाणूंचे कार्य चालत नाही, यासाठी मातीचे आरोग्य समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगून श्री. बिराजदार म्हणाले, सर्व प्रकारच्या निष्ठांसाठी शेतकरी बाजारावर अवलंबून असतो मात्र आता शेतकऱ्यांनी शेतीसाठी स्वतःची निविष्ठा तयार करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यात नैसर्गिक / सेंद्रिय शेती महत्वाची ठरणार आहे. यासाठी निसर्गानुरुप शेती पद्धतीचा अवलंब होणे नितांत आवश्यकता आहे. सेंद्रिय शेती शाश्वत होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याने सेंद्रिय शेती मागचा उद्देश शेतकऱ्यांमध्ये पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे श्री. बिराजदार म्हणाले. प्रकल्प संचालक जांबुवंत घोडके यांनी स्वागत करून प्रास्ताविकात जिल्ह्यात सेंद्रिय शेतीबाबत राबविण्यात येत असलेले उपक्रम, सेंद्रिय शेतीसाठी गठित करण्यात येत असलेल्या गटांबाबत माहिती दिली. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेत १० ड्रम थेअरी, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, सेंद्रिय शेतीतील निविष्ठा निर्मिती, सेंद्रिय शेती काळाची गरज, पशुधन आधारित सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेती मृद-आरोग्य व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीतील कीड रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती/नैसर्गिक शेती अनुभव कथन या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा