गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३

महिलांविषयक योजनांच्या गतीमान अंमलबजावणीसाठी “मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान"

नवरात्रोत्सव विशेष महिलांसाठीच्या योजना भाग - 5 महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, त्यांची सर्वांगीण उन्नती आणि विकास व्हावा यासाठी राज्य व केंद्र शासनामार्फत अनेकविध योजना राबविल्या जात आहेत. महिलांविषयक शासन योजनांचा लाभ पात्र व गरजू महिलांना व्हावा यासाठी राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी “मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान" राबविण्यास महिला व बाल विकास विभागाने 6 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. महिलांना संघटीत करणे, त्यांना प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलांच्या संदर्भात राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतीमान करणे हा “मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा" उदात्त हेतू आहे. यासाठी महिलांशी संबंधित योजना राबविण्याऱ्या सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे व त्या लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यासाठी राज्यामध्ये 2 ऑक्टोबर, 2023 ते 1 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत “मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान" राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या रुपरेषेबाबत थोडक्यात.... अभियानाची रुपरेषा (1) शक्ती गटांच्या/महिला बचत गटांच्या माहितीचे संकलन करणे. :- तालुका / नगरपालिका / महानगरपालिका स्तरावर विविध शासकीय यंत्रणांकडे नोंदणीकृत असलेल्या शक्ती गटांची/ महिला बचत गटांची माहिती संकलित करणे. कार्यान्वित शक्ती गट/ महिला बचत गट निश्चित करणे. महिलांच्या सबलीकरणासाठी आवश्यक बाबींचे निश्चितीकरण करणे. (2) महिलांना मुख्य प्रवाहात आणणे. :- राज्यातील 1 कोटी महिलांना शक्ती गटाच्या/महिला बचत गटाच्या प्रवाहात जोडणे. अभियानाच्या कालावधीत महसूली विभागात किमान 20 लाख महिलांना, महिला बचत गटासोबत शक्ती गटासोबत जोडणे. प्रत्येक जिल्ह्यात किमान 2 लाख 50 हजार महिलांना, शक्ती गटाच्या/ महिला बचत गटाच्या माध्यमातून जोडणे. प्रत्येक तालुक्यात किमान 30 हजार महिलांना, शक्ती गटाच्या/ महिला बचत गटाच्या माध्यमातून जोडणे. प्रत्येक गावात किमान 200 महिलांना, शक्ती गटाच्या/ महिला बचत गटाच्या माध्यमातून जोडणे (3) एकत्रिकरण व प्रशिक्षण:- शासनाचे विभाग, प्रशिक्षण संस्था, सेवाभावी संस्था यांचे माध्यमातून किमान 10 लाख महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण देणे. शक्ती गट / महिला बचत गट यातील सदस्यांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे. (4) वित्तीय भांडवल उपलब्धता:- सद्यस्थितीतील उद्योगास वा त्याच्या विस्तारासाठी तसेच नव्याने उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या महिलांना वित्तीय भांडवल उपलब्ध करून देणे. (5) उद्योगवाढीसाठी प्रशिक्षण:- उद्योग विस्तारासाठी इच्छुक महिलांना प्रशिक्षण देणे. प्रशिक्षित महिलांना इतर स्थानिक उद्योगासंबंधी लिंकेज करणे. प्रशिक्षित सदस्यांना स्थानिक व ग्लोबल मार्केट कसे मिळवून देता येईल याबबातच्या मार्केटींग बाबतचे प्रशिक्षण देणे. जिल्हा व तालुका स्तरावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अधिकारी, प्रशिक्षण संस्था यांचा सहभाग या अभियानात वाढविणे. (6) कच्चा माल:- कमी दरामध्ये कच्चा माल उपलब्ध होईल यासाठी समन्वय करणे व त्यासाठी ऑनलाईन यंत्रणा उभी करणे. (7) थेट ग्राहकांपर्यंत वस्तू व सेवांचा पुरवठा प्रणाली:- उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक बाजारपेठ उपलब्ध करणे. यासाठी पुरवठा प्रणाली विकसित करण्यासाठी संबंधितांसमवेत करार करणे. (8) शासकीय योजनांचा लाभ :- महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष मोहिम राबविणे. (9) शक्ती गट / महिला बचत गट संमेलन :- जिल्हा व तालुकास्तरीय महिला बचत गट संमेलन आयोजित करुन महिलांना प्रेरित करणे. (10) या अभियानांतर्गत महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, तांत्रिक व्यावसायिक प्रशिक्षण, महिलांसाठी आरोग्य शिबीर, महिला रोजगार मेळावा, महिला बचत गटांचे/शक्ती गटांचे स्टॉल व उत्पादन प्रदर्शन, विविध सरकारी विभाग व महामंडळाचे योजना माहिती स्टॉल, नवीन शक्ती गटांची / महिला बचत गटांची नोंदणी, शक्ती गटांची / महिला बचत गटांची क्षमता बांधणी व प्रशिक्षण, महिलांना सखी किट चे वाटप, शक्ती गटांची / महिला बचत गटांची जोडणी, सी.एस.आर अंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ देणे, उद्योग उभारणीस अर्थसहाय्य देणे, महिला उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, प्रोत्साहनपर पारितोषिक वाटप करणे आदि कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचे समन्वय मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. संकलन- एकनाथ पोवार माहिती अधिकारी, सांगली 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा